अहमदनगर

घोलप यांच्या आरोपांचे घेणे- देणे नाही : भाऊसाहेब वाकचौरे

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला शिर्डी मतदार संघात काम करण्याचे आदेश दिले, तेव्हापासून मी कामास सुरुवात केली; परंतु माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी माझ्यावर आरोप केले, ते मी पाहिले अथवा ऐकले नाहीत असे सांगत, घोलप यांनी केलेल्या आरोपांचे मला काही घेणे- देणे नसल्याचे मत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा. वाक्चौरे यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले. यानंतर प्रथमच ते संगमनेर तालुक्यात खांडगाव येथे खांडेश्वराच्या दर्शनास आले होते. यावेळी माजी मंत्री घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला अन् मिलिंद नार्वेकर तुम्हाला ठाकरे यांच्या दौर्‍यात पुढे- पुढे करीत होते, असा आरोप केला . याबाबत वाक्चौरे यांना विचारले असता ते म्हणाले, मी काही पाहिले नाही अथवा ऐकले नाही आणि त्यांनी केलेल्या आरोपांचे मला काही घेणे- देणे नाही. काही मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये खासदार झालो होतो.

त्यानंतर जे काही झाले त्यावर मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा करणे मला गरजेचे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या मनातही होतं की, मी शिवसेनेत यावे अन माझ्याही मनात होतं की, शिवसेनेत जावे. या दोन्हींचा मेळ बसला आणि पक्षप्रमुख ठाकरे यांनी स्वतः माझ्या हातात शिवबंधन बांधले. त्यांनी मला शिर्डी मतदार संघात जनतेची कामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मी आता शिर्डी मतदार संघात कामांसाठी सक्रीय झालो. जसा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी शरसंधान होता, तसाच आता उद्धव ठाकरे यांचा आदेश शरसंधान आहे, म्हणूनच शिर्डी मतदारसंघात प्रत्येक गावात फिरत आहे. आज मी खांडेश्वराचे आशीर्वाद घेतले. मी शेवटच्या क्षणापर्यंत लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार असल्याचे वाक्चौरे यांनी ठणकावून सांगितले.

शिर्डी मतदारसंघात जनसेवा करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून या मतदारसंघात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची खांडेश्वराने मला शक्ती द्यावी. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होण्याची संधी मिळो, असे साकडे घातल्याचे ते म्हणाले.
यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ यांच्या हस्ते माजी खा. वाक्चौरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, पं. स. माजी सदस्य अशोक सातपुते, देवस्थान ट्रस्टचे सचिव प्राचार्य अशोक गुंजाळ, संजय गुंजाळ, कपिल गुंजाळ, संदीप गुंजाळ आदी उपस्थित होते.

सध्या संपूर्ण मतदारसंघात दुष्काळ पडलेला आहे. जनावरांच्या चार्‍या- पाण्यासह पाट पाणी, विजेचा प्रश्न गंभीर झाला. याबाबत जिल्हाधिका-र्‍यांमार्फत राज्य सरकारला निवेदन दिले. सध्या राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा अ.नगर जिल्ह्यात कमी पाऊस आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्यामार्फत सरकारकडे करणार आहे.
                                – भाऊसाहेब वाकचौरे माजी खा., उद्धव ठाकरे शिवसेना

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT