नेवासा : पुढारी वृत्तसेवा : घोडेगाव तालुका प्रस्तावाला नाशिक विभागीय आयुक्तांनी पुढील शासकीय कार्यवाहीसाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे मंत्रालय स्तरावर अंतिम मान्यतेसाठी शासकीय कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती फुले-शाहू- आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर वैरागर यांनी दिली. वैरागर यांनी सांगितले की, ब्रिटिश सरकारने सन 1908 साली नेवासा मामलेदार कचेरीची निर्मिती केलेली आहे. सुमारे 107 वर्षांनंतर ग्रामदैवत श्री घोडेश्वरीच्या नावाने महाराष्ट्रासह सीमावर्ती राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव या नवीन तालुका निर्मितीची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी तयार केलेला घोडेगाव तालुका निर्मितीचा प्रस्ताव वैध ठरल्याने, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रस्तावाला पुढील शासकीय कार्यवाहीसाठी मंजुरी दिलेली आहे. अवर मुख्य सचिव (महसूल) यांच्या स्तरावर अंतिम मान्यतेसाठी शासकीय कार्यवाही सुरू झालेली आहे.
सध्या जिल्ह्यात नगर, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, नेवासा, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, अकोला, संगमनेर व कोपरगाव या 14 तालुक्यांचा समावेश आहे. सध्यस्थितीत नाशिक विभागीय आयुक्तांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श राज्यघटना, महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1966 मधील तरतुदी, तसेच महाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या रीतीनुसार प्रस्ताव अधिकृत केलेला असल्याने घोडेगाव तालुका निर्मितीचा शासकीय राजमार्ग प्रशस्त झालेला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव जाण्याचा पहिला बहुमान घोडेगावला मिळालेला आहे. प्रस्तावित जागेवर सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या कल्याणासाठी मानवतेचे भव्यदिव्य मंदिर उभे रहावे, यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचे वैरागर यांनी सांगितले.
विकासाला चालना मिळणार!
महाराष्ट्र शासनाच्या तीन सिहांची राजमुद्रा ग्रामदैवत श्री घोडेश्वरीच्या घोडेगाव तालुक्याला मिळावी, हा संकल्प आहे. घोडेगाव तालुका झाल्यानंतर घोडेगावच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच चालना मिळणार आहे, असा विश्वासही वैरागर यांनी व्यक्त केला आहे.