अहमदनगर

सावेडी उपनगरात कचर्‍याचे ढीग; चार-चार दिवस घंटागाडी येत नसल्याचा आरोप

अमृता चौगुले

नगर; पुढरी वृत्तसेवा : शहरातील सावेडी उपनगरामध्ये पाईपलाईन रोड, निर्मलनगर, यशोदानगर, भिस्तबाग परिसरात चार-चार दिवस कचरा संकलन करणारी घंटागाडी येत नसल्याने रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचत आहेत. घटनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांना संपर्क केला असता ते टोलवा-टोलवीची उत्तरे देतात. कचर्‍याचा ढीग साचल्यानंतर परिसरात दुर्गंधी सुटते, अशी कौफितय महिलांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासमोर मांडली.

सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरातील महिलांनी कचर्‍याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने थेट उपायुक्तांसमोर गार्‍हाणे मांडले. यावेळी माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार व उपनगरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निर्मलनगर, यशोदानगर, पाईलपाईन रोड, पाईपलाईन हाडको परिसरासह प्रभाग दोन व एकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन करणारी घंटागाडी निममित येत नाही.

त्यामुळे रस्त्याच्याकडेच्या रिकाम्या प्लॉटवर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. घंटागाडी येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकीत आहेत. तर, काही ठिकाणी नाल्यातच कचरा आणून टाकला जात आहे. परिणामी परिसरात कचर्‍याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. घंटागाडी दररोज येण्याबाबत संबंधित घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क केला असता कर्मचारी दुर्लक्ष करतात. ठेकेदार कचरा संकलनाच्या एकाही नियमाचे पालन करीत नाही, असे गार्‍हाणे महिलांनी मांडले.

दरम्यान, कचर्‍याच्या प्रश्नांवर अनेक वेळा स्थायी समितीत तसेच अनेक वेळा महापौर, उपमहापौर यांनी स्वतंत्र बैठका घेऊन कचरा उचलण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांच्या सूचनाही ठेकेदाराकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केला.

ठेकेदाराच्या ठेक्याची मुदत संपत आले आहे म्हणून त्याने कशाही प्रकार काम करावे योग्य नाही. संबंधित ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना तत्काळ तंबी दिली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल.
                                                                          – यशवंत डांगे,
                                                                      उपायुक्त, महापालिका

अग्रिमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे कचर्‍याच्या ठेकेदाराकडून नियमांचे पालन होत नाही. आठ-आठ दिवस घंटागाडी येत नाही. त्या घंटागाडी झाकलेली नसते व कर्मचार्‍यांना गणवेश नाही. याबाबत अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यास ते कर्मचार्‍यांना पाठीशी घातात. कचरा उचलण्यासाठी नगरसेवकांनी फोन केल्यानंतर जुजबी उत्तरे दिली जातात. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे.
                                                                   – निखील वारे, माजी नगरसेवक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT