शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोला शॉटसर्किटने आग लागली. अग्निशामक दलाच्या प्रयत्नातून सांयकाळी ही आग आटोक्यात आली. मात्र, नैसर्गिक हवेने कचरा पेटता होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यासह कमचारी रात्री उशिरापर्यंत डेपोवर ठाण मांडून होते.
शेवगाव-गेवराई रोडलगत असलेल्याा नगरपरिषद घनकचरा डिंपंग ग्राऊंड मधील कचरा डेपोला रविवारी दुपारी दोन वाजता शॉटसर्किटने आग लागली. रखवालदार सर्जेराव रणदिवे यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पाण्यानेे आग विझविण्याचा प्रयत्न केला. अधिकारी व इतर कर्मचार्यांशी संपर्क सांधून आगीची माहिती दिली. कचरा डेपोत प्लास्टिक कचर्याचा भरणा होता. त्यात वारे व वावळटीने पेटलेला कचरा डेपोच्या चोहोबाजूने उडाल्याने आग पसरू लागली.
त्यामुळे तातडीने अग्निशामक दलाला संपर्क साधावा लागला. तहसीलदार छगन वाघ, मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी नगरपरिषद, वृद्धेश्वर कारखाना, गंगामाई कारखान्याच्या अग्निशामक दलांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सुमारे तीन तासांनी सांयकाळी 5 वाजता आग आटोक्यात आली. मात्र, काहीशी हवा चालू असल्याने अधूनमधून कचर्यातून धुराचे लोट बाहेर पडत होते.
कंपोस्ट खतनिर्मितीची यंत्रसामग्री बचावली
आगीत किती नुकसान झाले, हे समजु शकले नाही. परंतु बहुतांशी कचरा व काही कंपोस्ट खत जळाल्याची माहिती आहे. ही आग लांब पसरली नाही. त्यामुळे सुदैवाने कंपोस्ट खत तयार करणार्या यंत्रसामग्रीलाा आगीची झळ पोहोचली नाही.