अहमदनगर

नगर : गगनगिरी महाराज सप्ताहास जाखुरीत आजपासून प्रारंभ

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे आजपासून सुरू होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे. आज (बुधवारी) सकाळी श्रीक्षेत्र खोपोली येथून आलेल्या गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची वाजत- गाजत मिरवणूक निघणार आहे. नाशिक येथील माधवदास महाराज राठी यांच्या सुश्राव्य शिवपुराण कथेने सप्ताहाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे (दि. 9 ते 16 ऑगस्ट) या कालावधीमध्ये स्वामीगगनगिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे.

अधिक मासातील हे सप्ताहाचे 7 वे पर्व आहे. सुमारे 17 एकर जागेमध्ये भव्य दिव्य मंडप, कथा मंडप, अखंड नामजप व पारायण सुरु होणार आहे. सप्ताहाच्या कालावधीत आरोग्य शिबीर रक्तदान, कीर्तन, प्रवचन अखंड अन्नदान सुरु राहणार आहे. या सप्ताहासाठी परिसरातून जवळजवळ 30 हजार भाविक, भक्त उपस्थित राहणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी दिवशी होणार्‍या काल्याच्या कीर्तनाला 1 लाखाच्या आसपास भावीक भक्त उपस्थित राहणार असल्याचे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष संजय महाराज देशमुख यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातून भाकरी घेऊन दररोज ट्रॅक्टर सप्ताहस्थळी येणार आहेत.

या सप्ताहात संगमनेर तालुक्यासह राहाता, सिन्नर, राहुरी व अकोलेतील 200 गावांचे सुमारे 1 हजार गगनगिरी महाराजांचे सेवेकरी दररोज नित्यनियमाने तन- मन- धनाने सेवा करणार आहेत. परिसरातील गावातील गगनगिरी महाराज भक्त मंडळ योगदान देत असल्याचे यांनी सांगितले. यावेळी वसंतराव देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब देशमुख, कपिल पवार, सुदीप वाकळे, सागर वाक्चौरे, दादासाहेब वर्पे, प्रमोद देशमुख व गगनगिरी महाराज भक्त उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनात 100 कंपन्या होणार सहभागी
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखोरी येथे आज (बुधवार) पासून सुरू होणार्‍या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ऋषी संस्कृतीबरोबर कृषी संस्कृतीचा एक मिलाप व्हावा, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सप्ताहस्थळी गगनगिरी कृषी भरारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनामध्ये शंभर कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती या कृषी प्रदर्शनाच्या विभागाचे प्रमुख प्रमोद देशमुख यांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT