अहमदनगर

नगर : दुसरा गणवेशही आला रे…! स्काऊट गाईडचा गणवेश

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीवरून स्काऊट गाईडच्या दुसर्‍या गणवेशासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 680 विद्यार्थ्यांसाठी 4 कोटी 79 लाख रुपये जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. संबंधित गणवेश खरेदीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना लेखी सूचना केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसुचित जाती, जमाती, तसेच दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना प्रती गणवेश 300 रुपयेप्रमाणे यापूर्वीच पहिल्या गणवेश खरेदीसाठी शासनाने निधी दिलेला आहे. यातून अनेक शाळांनी पहिला गणवेश खरेदी केलेला आहे. आता दुसर्‍या गणवेशासाठीही शासनाने निधी देवू केलेला आहे.

दरम्यान, दुसरा गणवेश हा स्काऊट गाईडचा असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार कमीज असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या शर्टवरतील शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे असणे आवश्यक आहे. हा गणवेश देखील शाळा व्यवस्थापन समिती खरेदी करणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस स्काऊट व गाईड विषयास अनुसरून हा गणवेश परिधान करणे आवश्यक राहणार आहे. 1 लाख 59 हजार 680 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 4 कोटी 79 लाख 4 हजारांचा निधी पीएफएमस प्रणालीव्दारे गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. संबंधित निधी खर्च करण्यात विलंब झाल्यास त्यास गटशिक्षणाधिकारी हेच जबाबदार राहणार असल्याचेही येरेकर यांनी म्हटले आहे.

'ते' विद्यार्थी पुन्हा वेटींगवरच !
चौकटः शासनाने यापूर्वी सर्वच विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात पहिला गणवेश हा अनुसुचित जाती, जमाती व दारिद्रयरेषेखालील मुलांनाच देण्याचे आदेश निघाले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वंचित विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याबाबत शासनाने धोरण स्वीकारले. त्यामुळे आता दुसरा स्काऊटचा गणवेश सर्वांनाच प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कालच्या आदेशान्वये पुन्हा एकदा दुसरा गणवेश हा 'त्या' पात्र लाभार्थ्यांसाठी देण्यात येत आहे. त्यामुळे आता दुसर्‍या गणवेशासाठीही 'त्या' वंचित विद्यार्थ्यांना आणखी वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT