राहुरी (नगर), पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील अतिवृष्टी बाधितांपैकी निम्म्याच शेतकर्यांना मदत मिळाली होती. तीन हजार 548 शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये सहा कोटी 19 लक्ष 86 हजाराची रक्कम पूर्वीच जमा झाली होती. केवळ राहुरी मंडळातील गावांची अतिवृष्टी बाधितांमध्ये नोंद झाल्याने शेतकर्यांची संख्या कमी झाली. वंचित असलेल्या दोन हजार 674 शेतकर्यांचे केवायसी प्रमाणिकरण सुरू झाल्याने निधी लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील सहा मंडळापैकी केवळ राहुरी मंडळात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 या काळात अतिवृष्टी झाल्याची नोंद शासकीय दप्तरी झाली. मागिल वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या काळामध्ये राहुरी तालुक्यात सर्वत्र अविवृष्टी झाली होती. महसूल विभागाने कृषी विभागासमवेत एकत्ररित्या शेतकर्यांच्या बांधावर जात पंचनामे केले होते. शासनाच्या निर्बंधानंतर राहुरी मंडळात अतिवृष्टी झाल्याचे घोषित केले होते. त्यानुसार सहा हजार 253 शेतकर्यांना 12 कोटी 95 लक्ष 35 हजाराची रक्कम मिळावी असा प्रस्ताव सादर केला होता.
पडताळणीमध्ये शेतकरी गावात राहत नसणे, केवायसी न जुळणे आदी कारणास्तव नावे कमी होऊन सहा हजार 222 शेतकर्यांना अतिवृष्टी निधी वाटपाचा निर्णय झाला. निधी मिळण्याची मागणी केल्यानंतर शासनाला जाग आली. त्यानंतर तीन हजार 548 शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये मदत निधी जमा झाला. सुमारे 619 कोटी रुपयांचा निधी वाटप झाल्यानंतर उर्वरित दोन हजार 674 शेतकरी मदतीपासून वंचित होती. राहुरी महसूल प्रशासनाने संबंधित शेतकर्यांना आपली केवायवसी तपासणी करीत आधार पडताळणी करून महा ई सेवा केंद्रामार्फत आपल्या नावावरील बँक खाते, आधार कार्ड क्रमांक तसेच शेती गट क्रमांक तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
शासकीय आदेशानुसार सहा हजार 222 शेतकर्यांपैकी 846 शेतकर्यांची मदत फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे 147 कोटी रुपयांचे अनुदान आकडेवारीतून कमी झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. संबंधित मदत ही राज्य शासनाकडून थेट शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे.
राज्य शासनाकडून थेट शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होत आहे. निम्म्या शेतकर्यांना मदत मिळाली आहे. उर्वरित शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण होताच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी दिली.
आधार प्रमाणिकरण करीत असताना शेतकर्यांच्या बँक खात्याची चुकीची नोंद, आधार क्रमांक चुकीचे असणे किंवा गट क्रमांक चुकीचे असलेल्यांनी तत्काळ राहुरी महसूल विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी योग्य कागदपत्र महसूल विभागाकडे दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार चंद्रजित रजपूत यांनी केले आहे.