अहमदनगर

अहमदनगर : घनकचर्‍याच्या निविदा प्रक्रियेत फसवणूक!

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : घनकचरा व्यवस्थापन या कामाच्या निविदेसाठी तांत्रिक सेवा पुरवठादार 'टीबीएफ इन्व्हरमेन्टल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून शासनाची फसवणूक करत आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सखोल चौकशी करून संबंधित कंपनीस काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी अनेक निविदा प्रसिद्ध होत आहेत. संबंधित कामे मिळविण्यासाठी 'त्या' कंपनीकडून ठेकेदारांना तांत्रिक सेवा पुरवण्याबाबतचे टाय-अप असल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. याच अटीनुसार श्रीरामपूर येथील खंडाळा, वडाळा महादेव या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. यात टायअप प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक ठेकेदारांनी वरील कंपनीशी संपर्क केला.

मात्र प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशा अनेक तक्रारी स्वराज्य संघटनेकडे आल्या आहेत. याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर यांनीही प्रमाणपत्र देताना मनमानी सुरू केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी येरेकर यांनी चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी कानवडे यांनी केली आहे.

सीईओंनी घेतली गंभीर दखल!

या संदर्भात स्वराज्य संघटनेने लक्ष वेधल्यानंतर त्याच निवेदनावर, 'सदर कंपनीचे वारंवार तक्रारी येत आहेत. तपासून घ्यावे. योग्य निर्देश द्यावेत', अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांना केल्या आहेत. त्यामुळे घनकचर्‍याच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेचीच चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सीईओंनी या प्रकरणात चौकशीचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे अहवाल सादर करणार आहेत.

– समर्थ शेवाळे,
प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता

SCROLL FOR NEXT