अहमदनगर

निघोज : पैलवानांवर साडेचार लाखांची खैरात

अमृता चौगुले

निघोज; पुढारी वृत्तसेवा : नामवंत कुस्तीगीरांच्या उपस्थितीत शंभरपेक्षा जास्त कुस्त्यांचा हगामा निघोज येथे मळगंगा यात्रेनिमित्त पार पडला. एक हजार रुपयांपासून ते 41 हजार रुपयांची शेवटची कुस्ती होती, तब्बल साडेचार लाख रुपयांची बक्षिसांची खैरात करीत निघोज ग्रामस्थ व कुस्ती शौकीनांनी हगाम्याचा आनंद घेतला.

अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, हरयाणा, तसेच राज्यातील कुस्तीगिरांनी हजेरी लावीत नेत्रदीपक कुस्त्यांचा थरार दाखविला. दुपारी तीन ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत लहान-मोठ्या सव्वाशे कुस्त्या झाल्या. शेवटच्या दीड तासांतील कुस्त्या पाहण्यासारख्या होत्या. मळगंगा देवीची गावातील यात्रा गुरुवार व शुक्रवारी झाली. शुक्रवारी सायंकाळी सहानंतर कुंडावरील यात्रा सुरू झाली.

टाकळी हाजी ग्रामस्थ आयोजित बैलगाडा शर्यत, छबिना मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, त्यानंतर टाकळी हाजी ग्रामस्थ आयोजित लोकनाट्य तमाशा, असे कार्यक्रम पार पडले. शनिवारी कुंड परिसरातील कुस्त्यांच्या हगाम्याने मळगंगा देवीच्या यात्रेची सांगता करण्यात आली.

शेतीविषयक साहित्य, घरगुती संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांच्या खेळणी, मेवा मिठाई अशाप्रकारे या यात्रेतील व्यावसायिक मोठ्या संख्येने येत असल्याने महिला व शेतकर्‍यांना ही यात्रा म्हणजे खरेदीची पर्वणी ठरते. दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेत झाली आहे. मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे आणि त्यातील जलधारा भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

सर्वांनाच देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी दर्शन रांगेत भाविकांसाठी चांगली व्यवस्था केली होती. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, संदीप वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या तसेच निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी नियोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT