अहमदनगर

अन् मिटला तीन पिढ्यांचा वाद..!

अमृता चौगुले

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील बेलपांढरी येथील शिंदे कुटुंबीय व धोत्रे कुटुंबीयात सन 1991 पूर्वीपासून जमिनीचा वाद होता, तो वाद राष्ट्रीय लोकअदालतीत तिसर्‍या पिढीत मिटला. दरम्यान, या लोकअदालतमध्ये 1057 प्रकरणे मिटली असुन, सात कोटी 28 लाख 43 हजार 250 रुपये वसूल झाले आहेत. बेलपांढरी येथे सरकारी दप्तरी शासकीय कर्मचार्‍यांकडून झालेल्या तांत्रिक चुकांमुळे जमिनीता वाद सुरू झाला. सन 1942 च्या दरम्यान शिंदे व धोत्रे कुटुंबीयांनी जमिनीची खरेदी केल्यानंतर पोटहिस्सा फाळणी नंबर 12 होऊन त्याबाबत चुकीच्या पद्धतीने 7/12 सदरील अंमल झाल्याने वादास सुरुवात झाली.

त्यानंतर सन 1991 मध्ये पहिला दावा नेवासा येथील न्यायालयात शिंदे यांच्यातर्फे दाखल झाला, त्यावर पुन्हा जिल्हा न्यायालयात अपिल झाले. तेथून पुढे दाव्यांची शृंखला चालू झाली. शिंदे व धोत्रे कुटुंबीयादरम्यान नेवासा न्यायालयात चार दिवाणी दावे व सात फौजदारी खटले दाखल होते. मूळ वाद हा 0.80 आर जमिनीचा होता. त्यात अनेकवेळा आपापसात वाद मिटविण्याचा प्रयत्न न्यायालयामार्फत करण्यात आला, परंतु यश आले नाही. त्यानंतर सन 2020 मध्ये व. स्तर दिवाणी न्यायाधिश ए. एम. हुसेन रुजू झाले. त्यांनी शिंदे कुटुंंबीयांचे वकील ए. बी. अंबाडे व धोत्रे कुटुंबीयांचे वकील आर. डी. खिळदकर व दोन्ही बाजूंकडील पक्षकारांना बोलावून वाद मिटण्यासारखा आहे. तो मिटविणारच, असे म्हणून अ‍ॅड. बी.ए. शिंदे यांची मध्यस्थ म्हणून नेमणुक केली. सर्वांच्या प्रयत्नानंतर हा वाद सामोपचाराने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नुकताच मिटविण्यात आला. त्यापूर्वी सदरचा वाद हा मुंबई उच्च न्यायालयाच्या, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ तसेच नेवासा व नगर येथील महसूल न्यायालयात जाऊन आला. परंतु, वाद मिटला नाही.

SCROLL FOR NEXT