श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आढळगाव येथील उबाळे बंधूंनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करीत नवसपूर्ती केली. दरवर्षी चैत्रपौर्णिमेला श्री सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत असतो. यात्रेच्या दिवशी वर्षभरात बोललेला नवस पूर्ण करण्याची प्रथा आहे. कुणी प्रत्येक पायरीवर नारळ फोडतो. कुणी अब्दागिरी, कुणी छत्री अर्पण करतो, तर कुणी पेढे वाटून नवसपूर्ती करतो.
आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचे बंधू ज्ञानेश्वर उबाळे यांनी आपला बंधू गावचा सरपंच झाल्यास श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा नवस केला होता. त्याच वर्षी त्यांचे बंधू शिवप्रसाद उबाळे सरपंच झाले. नवसपूर्तीसाठी त्यांनी हेलिकॉप्टर मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते शक्य झाले नाही. यावर्षी यात्रेच्या मुख्य दिवशी उबाळे बंधू, माजी आमदार राहुल जगताप, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे यांनी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करीत नवसपूर्ती केली.
उबाळे बंधूंचा नवस पूर्ण
माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, आढळगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरावर पुष्पवृष्टी करून नवस पूर्ण केला, ही समाधानाची बाब आहे. हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
पुष्पवृष्टीनंतर समाधान
मंदिरावर पुष्पवृष्टी केल्यानंतर ज्ञानेश्वर उबाळे म्हणाले, बंधू शिवप्रसाद उबाळे हा गावचा प्रथम नागरिक व्हावा ही इच्छा होती. ती पूर्ण होण्यासाठी नवस बोललो होतो. पुष्पवृष्टी करून नवसपूर्ती केली. पुष्पवृष्टी केल्यानंतर आनंद आणि समाधान वाटले.