अहमदनगर

कोपरगाव नगरपालिकेच्या पाच लिपिकांना केले निलंबित; कर अहवाल तपासणीत हलगर्जीपणाचा ठपका

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: नगरपालिकेच्या प्रभारी लिपिक पदावर काम करणार्‍या पाच लिपिकांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी २८ सप्टेंबरला तडकाफडकी निलंबीत केले. घरपट्टीबाबत एस. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेला अहवाल तपासणी कामी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. राजेंद्र इंगळे, राजेंद्र शेलार, रवींद्र वाल्हेकर, आर. आर. अमोलिक व संजय तिरसे (सर्व प्रभारी लिपिक) अशी निलंबित कर्मचार्‍यांची नावे असून, त्यांना पालिकेच्या आस्थापना विभागामार्फत नोटिसा बजावल्या आहेत.

वसुली विभागातील पाच प्रभारी लिपिकांनी कर अधीक्षक श्वेता शिंदे व पल्लवी सूर्यवंशी यांनी सूचना केलेली असताना त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले. या कारणास्तव त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. सध्या कोपरगाव नगरपालिकेच्या व अवास्तव घरपट्टीचा मुद्दा ऐरणीवर असून याबद्दल गावातील नागरिकांत तीव्र रोष असून भाजपा शिवसेना रिपाइ (आठवले गट) यांनी मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाच्या ठिकाणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे संध्याकाळी चर्चेसाठी गेले असता उपोषणकर्त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांमुळे मुख्याधिकारी अडचणीत सापडले होते.

त्यात उपस्थित असलेल्या एस. आर. कंपनी एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या अधिकार्‍याने सर्व्हेमध्ये दहा टक्के चूक झाल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. यावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनीही सर्व्हेमध्ये मोठ्या चुका झाल्याचे मान्य केले होते. यावर उपोषणकर्त्यांनी सदर ठेकेदाराकडून 75 लाख रुपये वसूल करावेत, त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे व 2022- 23 सालामागील प्रमाणेच घरपट्टी वसूल करावी. ज्यावेळेस नवा सर्व्हे होईल, त्यावेळेस त्यानुसार पट्टी आकारावी, अशी मागणी केली होती. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे ठणकावून सांगितले होते. मात्र मुख्याधिकारी यांनी असे करणे आपल्या हातात नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा तिढा कायम राहिला होता.

या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी बुधवारी वसुली विभागातील वरील पाच प्रभावी लिपिकांना कर अधीक्षक यांच्या अहवालाचा हवाला देत तडकाफडकी निलंबित केले असल्याचे समजते. दरम्यान सदर कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपये अदा केल्याचे समजते. त्यामुळे ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्याने प्रशासन अडचणीत आल्याचे दिसते. त्यामुळे 'वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीप्रमाणे सदर पाच लिपिकांचा बळी दिले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

ज्या वसुली विभागाच्या पाच लिपिकांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी बुधवारी निलंबित केले. त्या वसुली विभागाच्या कर अधीक्षक श्वेता शिंदे व पल्लवी सूर्यवंशी या आहेत. त्यांच्या शिफारशी व अहवालानंतरच सर्व्हे करणार्‍या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपये अदा केले आहेत. जर या अधिकार्‍यांच्या हाताखालील लिपिकांनी कामात हलगर्जीपणा केला. हे माहीत असतानाही या विभागाच्या कर अधीक्षक यांनी सदर आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला 40 लाख 72 हजार 538 रुपयांची रक्कम कशी अदा करण्याची शिफारस कशी केली. आज अवास्तव घरपट्टीने गाव पेटले नसते तर हा विषय झाला असता का?

असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ? कारण ही रक्कम लिपिकांच्या आदेशाने कंपनीला दिली नाही हे सत्य आहे, मग या लिपिकांना दोषी धरले मग कक्ष अधिकारी यांचे काय? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन 2022-23 साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने मंगळवार (27 सप्टेंबर) पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

मुख्याधिकार्‍यांची उडवाउडवीचे उत्तरे
मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना याबाबत विचारणा करण्याकरता फोन केला असता, या अधिकार्‍यांना फोन उचलले नाहीत व माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याबाबतही पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT