अहमदनगर

नगर : कोल्हार बसस्थानकाच्या आवारात असणार्‍या व्यापारी गाळ्यांना आग

अमृता चौगुले

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील बसस्थानकाच्या आवारात असणार्‍या व्यापारी गाळ्यांना आग लागली. या आगीमध्ये प्लॅस्टिक फायबरच्या वस्तुंचे विक्री करणारे दुकान भस्मसात झाले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठे अर्थिक नुकसान झालेले आहे. कोल्हार येथे झुंबरलाल कुंकूलोळ व्यापारी संकुला नजीक बस स्थानकाच्या आवारात राज्य परिवहन महामंडळाचे व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. या गाळ्यांमध्ये ज्ञानेश्वर मधुकर कोळपकर यांचे प्लॅस्टिक फायबर युटेनशील मटेरियल व शेती उपयोगी विविध वस्तू विक्रीचे होलसेल दुकान आहे. यासाठी त्यांनी या संकुलातील काही गाळे भाडेतत्वार घेतलेले आहे. या गाळ्यांना मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. बंद दुकानातून धूर येत असल्याचे नगर- मनमाड रोड लगत चहाचे दुकान असलेल्या अमोल बोरुडे यांना दिसले. त्यांनी तत्काळ कोळपकर परिवाराला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली.

ज्ञानेश्वर कोळपकर व त्यांचा मुलगा कुणाल कोळपकर हे तत्काळ दुकानाकडे आले. परंतु दुकानात असलेल्या प्लॅस्टिक वस्तू असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. स्फोटासारखे आवाज झाल्याने व आरडाओरडा ऐकून संकुलातील जवळपासचे रहिवाशी जागे झाले. तेही घटनास्थळी मदतीकरता धावून आले. काही नागरिकांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या अग्नीशमन विभागाला कळविले. कारखान्याचे अग्नीशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या.

या आगीत एक कोटी दहा लाख रुपयाचे प्लास्टिक मटेरियल, 10 लाख रुपयांचे फर्निचर, दुकानातील लॅपटॉप, प्रिंटर, नोटा मोजण्याचे मशीन व रोख रक्कम दहा हजार रुपये असे एकूण 1 कोटी 25 लाखांचे साहित्य जळून भस्मसात झाले.
घटनास्थळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिलीप गाढे व त्यांचे कर्मचारी कोल्हार औट दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी, कोल्हार बुद्रुकच्या तलाठी सुरेखा आबुज यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तलाठी आबुज यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी चर्चा होती.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण

आगीचे गांभीर्य पाहून गणेश कारखाना, श्रीरामपूर नगर परिषद आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या. काही मिनीटातच याही गाड्या घटनास्थळी आल्या. फायर ब्रिगेडचे कर्मचारी व नागरिकांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेड व नागरिकांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT