अहमदनगर

नगर : 22 लाख महिलांना एसटीचा आर्थिक दिलासा

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत जाहीर केली. या निर्णयाची शुक्रवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे नगर शहरातील बसस्थानकांवर उपस्थित महिला प्रवाशांत आनंदाचे वातावरण होते. जिल्हाभरातील जवळपास 22 लाख महिलांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

राज्य एसटी महामंडळाच्या वतीने समाजातील विविध घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकिट दरात सवलत दिली जात आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 वर्षे पूर्ण करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत दिली.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची बसमध्ये गर्दी वाढली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर केला. महिलांना एसटीच्या प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत जाहीर करुन शासनाने महिलांना आर्थिक दिलासा दिला. ही योजना महामंडळ स्तरावर 'महिला सन्मान योजना' म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु झाली असून, प्रत्येक प्रवासी महिलेकडून तिकिट दराच्या 50 टक्के पैशाची आकारणी करण्यात आली. अचानक 50 टक्के रक्कम वाचल्यामुळे महिला प्रवाशांत आनंदाचे वातावरण पसरले होते.

जिल्ह्याची 2011 मध्ये एकूण लोकसंख्या 45 लाख 43 हजार 159 इतकी आहे. यामध्ये 22 लाख 334 महिलांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत साडेपाच टक्के वाढ ग्रहीत धरल्यास जिल्ह्यात महिलांची लोकसंख्या 23 लाख 21 हजार एवढी आहे. जवळपास दीड लाख महिला यापूर्वीच 50 टक्के सवलतीचा लाभ घेत आहेत. त्यामुळे 22 लाख महिलांना एसटीच्या महिला सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT