अहमदनगर

अखेर उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु ; 11 गावांना वरदान

अमृता चौगुले

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बंद पाडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना त्यांनीच सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन, नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप केला, मात्र ही योजना फक्त काळे परिवारचं चालवू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. उजनी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात म्हणाले. कोपरगाव मतदार संघाच्या दक्षिण भागातील 11 गावांना वरदान ठरणा-या उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेला 2004 पूर्वी शासनाकडून नॉट फेजीबल (उपयुक्त नाही) असा शेरा मारण्यात आला होता.

परंतु रांजणगाव देशमुख, काकडी, मनेगाव, वेस-सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या 11 गावांतील नागरिकांसाठी ही योजना किती महत्वाची आहे, याची जाण असणारे माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2005 साली विधान सभा अधिवेशनात उजनी चारी उपसा जलसिंचन योजने संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विद्यमान राज्यपालांकडे जावून या उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली. राज्यपालांनी दखल घेत मागणी योग्य ठरविली. राज्यपालांनी पाटबंधारे मंत्र्यांना योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना केल्या. तेव्हापासून 2014 सालापर्यंत माजी आमदार काळे यांनी स्वतःच्या कार्यकाळात योजना पदरमोड करून अखंडपणे कार्यान्वित ठेवली, मात्र 2014 नंतर पुन्हा बंद पडल्याने कायम दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या 11 गावांतील शेतकर्‍यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या. 'विधानसभा निवडणुकीपूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करणार,' दिलेला हा शब्द आ. काळे यांनी निवडून येताच पूर्ण केला. 11 गावांतील शेतकर्‍यांचे चेहरे पुन्हा खुलले.

यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ओव्हर फ्लोच्या पाण्यावर भवितव्य अवलंबून असलेली ही योजना बंद राहणार होती, मात्र आ. काळे यांनी पाटबंधारेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पाणी उपलब्ध झाले, मात्र योजनेच्या पंपाच्या दुरुस्ती बीलासह इतर दुरुस्ती खर्च केल्याशिवाय योजना सुरु होणार नव्हती. यामुळे आ. काळे यांनी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पदरमोड करून पंप दुरुस्ती खर्चाचा भार सोसल्याने उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित झाली. यावेळी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, चंद्रकांत पोकळे, गणेश थोरात, नवनाथ पोकळे, अनिल वाणी, गोरक्षनाथ वाकचौरे, शिवाजी थोरात, विलास थोरात आदी उपस्थित होते.

'आ. आशुतोष काळे यांनी 11 गावांसाठी 'निळवंडे'च्या पाण्यासह अतिरिक्त दीड टीएमसी पाणी देखील मंजूर करून घेतले. यामुळे साठवण तलाव तुडुंब भरले. निळवंडे असो वा उजनी चारी उपसा जलसिंचन योजना, काळे परिवाराशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे अधोरेखित होत आहे.
                         – बाबुराव थोरात, अध्यक्ष-उजनी चारी उपसा जलसिंचन योजना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT