अमोल गव्हाणे
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले. 18 जागांसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत जगताप- पाचपुते- नाहटा- शेलार विरुद्ध नागवडे- पाचपुते – भोस, अशी लढत होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राजकीय वादाची ठिणगी पडल्यानंतर श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले. अर्थात जगताप- नागवडे गट एकमेकांपासून दूर नाही तर एकमेकांच्या विरोधात उभा राहिला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले.
नागवडे कारखाना निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले माजीमंत्री आमदर बबनराव पाचपुते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ही निवडणूक एकत्र लढण्याची भूमिका घेतली अर्थात ही सगळ घडवून आणण्यात ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचा मोठा वाटा आहे. तर, दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नाहटा यांनी काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांना सोबत घेत निवडणुकीतील चुरस अधिक वाढवली.
आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पॅनेलचे नेते शहरात ठाण मांडून होते. अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांची विनवणी सुरू होती. काही उमेदवारांनी नेत्यांचा शब्द प्रमाण मानत उमेदवारी अर्ज घेतले, तर काहींनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंद केले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी प्रस्थापित आणि सत्ताधारी मंडळींच्या विरोधात स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा प्रयत्न केला; मात्र ऐनवेळी त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.
शेतकरी प्रश्नावर आवाज उठविणारे टिळक भोस यांची नागवडे गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती; मात्र माघारीच्या अंतिम क्षणी त्यांचा पत्ता कट करून रामदास झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली. टिळक भोस यांना जगताप गटाकडूनही उमेदवारी मिळू नये यासाठी ठराविक यंत्रणा शेवटपर्यत राबत होती. या निवडणुकीत जगताप- नाहटा यांचा शेतकरी विकास पॅनल, तर नागवडे – पाचपुते गटाचा किसान क्रांती शेतकरी विकास पॅनल आहे.
विश्वासघात केला !
नागवडे गटाकडून आपल्याला उमेदवारी दिली गेली होती. मी निवडणूक करण्यास इच्छुक नसतानाही उमेदवारीचा शब्द दिला गेला. मात्र, माघारीच्या अंतिम क्षणी आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. नागवडे गटाने आपला विश्वासघात केला असून, वेळ येताच त्याची परतफेड करू.
म्हणून पत्ता कट
टिळक भोस यांनी मागील काही वर्षात बाजार समितीच्या वेगवेगळ्या विषयात आंदोलन करून बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. भोस यांना उमेदवारी देऊन निवडून आणल्यास बाजार समितीत डोकेदुखी वाढविण्यापेक्षा आताच उमेदवारी नाकारून त्यांचा पत्ता कट केलेला योग्य राहील यावर नागवडे- जगताप गटाचे एकमत झाले अन् भोस यांची उमेदवारी नाकारली.
शेतकरी विकास पॅनल
सोसायटी मतदार संघ : दीपक भोसले, अनिकेत शेळके, अजित जामदार, बाबा जगताप, भास्कर वागस्कर, नितीन डुबल, पंडित गायकवाड, मनीषा मगर, अंजली रोडे, प्रवीण लोखंडे, दत्तात्रय गावडे, ग्रामपंचायत मतदार संघ : साजन पाचपुते, मितेश नहाटा, देविदास शिर्के, शंकर पाडळे, व्यापारी : आण्णा औटी, शिवाजीराव शेळके, हमाल मापाडी : किसन सिदनकर,
किसान क्रांती शेतकरी पॅनेल
सोसायटी मतदार संघ : रोहिदास पवार, प्रदीप कोकाटे, संतोष ओव्हळ, सुभाष वाघमारे, दत्तात्रय पानसरे, निवास नाईक, रामदास झेंडे, सविता बारगुजे, सविता नलगे, वैभव पाचपुते, ज्ञानदेव खरात, ग्रामपंचायत मतदार संघ : महेश दरेकर, सुदाम झराड, प्रशांत ओगले, लक्ष्मण नलगे, व्यापारी : लौकिक मेहता, आदिक वांगने, हमाल मापाडी : भाऊसाहेब कोथींबीरे.