अहमदनगर

नगर तालुका : शेतकर्‍यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

अमृता चौगुले

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावात चार दिवसांपासून वीज नाही. त्यामुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. त्याच्या निषेधार्थ जेऊर महावितरण कार्यालयावर शेतकर्‍यांनी मोर्चा काढून अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेतकर्‍यांच्या संतप्त भूमिकेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता..

गेल्या चार दिवसांपासून पिंपळगाव माळवी येथे शेतीपंपाची वीज नाही. तसेच पाच महिन्यांपासून सिंगल फेज नाही. शेतीपंपाच्या विजेअभावी शेतातील पिके जळून चालली आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वीज नसल्याने त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकीच्या वेळेला जाणीवपूर्वक वीज पुरवठा बंद केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतीचे नुकसान, तसेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर जाणूनबुजून वीज घातल्याप्रकरणी महावितरण अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. पिंपळगावच्या शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत अनेक तक्रारी केल्या. पैसे घेतल्याशिवाय रोहित्र बसविण्यात येत नाही.

कर्मचारी नशेत असतात. कार्यालयातील कर्मचारी फोन उचलत नाहीत. पाच महिन्यांपासून गावात सिंगल फेज नाही. चार दिवसांपासून शेतीची वीज गायब आहे. जनावरांचे चारा-पाण्या वाचून हाल सुरू आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे कार्यालयातील कर्मचारी मनमानी करत आहेत. अशा संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.

मांजरसुंबा गड येथील नागरिकांनी तलावात अनधिकृत वीजपंप बसविले आहेत. त्यामुळे पिंपळगावला कमी दाबाने वीजपुरवठा होतो. येथील अनधिकृत वीजपंपांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच महानगरपालिकेच्या जागेवर रोहित्र बसविण्यास कोणी परवानगी दिली, त्याची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण अधिकार्‍यांना चांगले धारेवर धरत खडेबोल सुनावले. शाळेतील विद्यार्थी देखील शेतकर्‍यांसोबत कार्यालयात दाखल झाले होते. शेंडी कक्षातील कनिष्ठ अभियन्या नाथ बडे यांनी शेतकर्‍यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी सरपंच राधिका प्रभुणे, माजी सरपंच संतोष झिने, माजी सरपंच विश्वनाथ गुंड, माजी उपसरपंच योगेश झिने, सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सोसायटी सदस्य संतोष निंभोरे, प्रेमचंद प्रभुणे, संजय प्रभुणे, आसाराम झिने, भीमराज गुंड, अशोक लहारे, रामदास खांडके, भीमराज झिने, सुधीर लहारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला मारून टाका
आम्हाला विष पाजून मारून टाका अथवा विजेचा शॉक देऊन मारा. आमच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आमचे कोणी ऐकत नाही. महावितरण कंपनी राजकीय दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे आम्हा शेतकर्‍यांना मारून टाका, अशी आर्त विनवणी शेतकरी करीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT