अहमदनगर

नगर : वादळ, पाऊस अन् धुके मारक ; पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून हवामानातील बदल रब्बी हंगामातील पिकावर विपरित परिणाम करणारा ठरत आहे. बहरलेल्या रब्बी हंगामाला वादळ, पाऊस अन् धुके मारक ठरताना दिसत आहे.  गेल्या 24, 25, आणि 26 जानेवारी रोजी झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने रब्बी गहू पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. गव्हाचे शेत वार्‍याच्या झोताने पार जमिनीवर झोपले आहे. पडलेल्या गव्हाच्या ओंब्यांना दाणे भरण्याची शक्यता धुसर झाली आहे. गहू पीक वगळता रब्बीतील कांदा, हरभरा, ज्वारी, ऊस ,गहू (ओंबीत न आलेला) आदी पिकांना झालेला पाऊस उत्तम मानला जातो आहे, मात्र, रब्बीच्या कांदा पिकावर धुक्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झालाआहे.

त्यावर औषध फवारणी जास्तीची करावी लागणार असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. अतिवृष्टीने खरीप पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली होती. आता रब्बी पिके नैसर्गिक आपत्तीला बळी पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आगीतून फुफाट्यात सापडल्याचे चित्र आहे. सद्य परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या अवकाळी संकटात शेतीपिके बाधित होत आहेत. सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसत असून, नुकताच रोपण झालेल्या कांदा पिकाला पडत असलेल्या धुक्यामुळे करपा व इतर रोगराईचा धोका वाढला आहे. औषध फवारणी करावी लागणार असून, वातावरणातून थंडी गायब होऊन हळूहळू उष्णतेत वाढ होणार असल्याने कांदा पीकवाढीच्या अवस्थेत असताना अशा नैसर्गिक आपत्तीत सापडत असल्याने शेतकरी चिंचेत आहेत.

फूल मोहरालाही धोका
आंबेबहरात आलेल्या आंबा, मोसंबी, संत्रा व इतर बागा आणि फळझाडांना आलेला फुलबहार वादळ वारे, पाऊस व पडणारे धुके, यामुळे बहार गळण्याचा संभव आहे. रब्बी पिकाबरोबर फळ झाडांनाही निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थितीचा फटका बसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT