अहमदनगर

जिल्हा बँकेत शेतकरी हाच केंद्रबिंदू ! : अध्यक्ष शिवाजी कर्डिले

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसापासून सर्व घटकांचा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठा विश्वास आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीत सातत्याने वाढ होत आहे. बँक कर्मचार्‍यांनी शेतकरी हा केंद्रबिंदु माणून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना अधिकाधिक सेवा देवून त्यांना बँकेच्या ठेवी, कर्ज त्याचबरोबर थकबाकी भरण्याबाबत प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराचा फायदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील अधिकारी व सेवक यांची कामकाज आढावा बैठक बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहामध्ये संपन्न झाली.

जिल्हा बँकेने जिल्ह्यातील अधिकारी व सेवक यांची बैठक प्रथमच आयोजित केली होती. याप्रसंगी यावर्षी जिल्ह्यातील बँकेतील 556 सेवकांना विविध वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आले. अशा प्रकारचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँक सेवकांना पदोन्नती देण्याचा निर्णय बँकेच्या इतिहासात प्रथमच झाल्याने बँक सेवकांच्या वतीने व स्टाफ क्रेडिट सोसायटीच्या वतीने अध्यक्ष कर्डिले, उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यास जिल्हयातील सर्व अधिकारी व सेवक हजर होते…

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे म्हणाले, अशा प्रकारच्या आढावा मिटींगमुळे अधिकारी व व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद साधला जात आहे. त्यामुळे अनेक अडचणी व प्रश्न यांची सोडवणूक होत आहे. तांत्रिक युगामध्ये अहमदनगर जिल्हा बँक मागे न राहता बँकेने मोठया प्रमाणावर प्रगती केली आहे. जर आपण गतीमान नाही झालो तर सहकारी संस्था नक्की अडचणीत येतील. त्यामुळे या युगात संस्थांच्या व्यवस्थापणासह अधिकारी व सेवकांनी नविन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेचा नुसतेच व्याज मिळवणे हा उद्देश नसून ग्रामिण भागातील विकासाबरोबरच शेतकर्‍यांच्या हिताचे काम करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्हयाच्या विकासात जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आढावा मिटिंगचा उद्देश विशद करून बँक कर्मचार्‍यांनी ठेवी व कर्ज वितरण वाढविण्यासाठी प्रयत्न मोठया प्रमाणावर करावेत. बँकींग सेवा सर्व ग्राहकांना कशा पध्दतीने उत्कृष्ट मिळेल हे बँक कर्मचार्‍यांनी जाणिवपुर्वक केले पाहिजे असे अवाहन केले. तसेच बँक कर्मचार्‍यांना बँकेच्या संचालक मंडळाने योग्य त्या सोयी सुविधेसह भरघोस पगारवाढ दिलेली आहे. बँक कर्मचारी अपुर्‍या कर्मचार्‍यासह कामकाज करतात याची जाणिव संचालक मंडळास आहे. असे असतानाही बँक कर्मचार्‍याकडून बँकेचे थकबाकी वसुलीसह बँकिंग कामकाज उत्कृष्ट होण्याची बँक कर्मचार्‍याकडून अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी नविन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणुक झालेले खरात यांचा कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, बँकेचे जनरल मॅनेजर, मॅनेजरसह जिल्हयातील तालुका विकास अधिकारी, शाखाधिकारी व सर्व अधिकारी व सेवक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT