अहमदनगर

जातपडताळणीसाठी जोडली बनावट कागदपत्रे

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जातीचा दाखला काढण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याचे जातपडताळणीमध्ये झालेल्या तपासणीत उघडकीस आले. दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी तालुक्यातील एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इंदर नन्हू शर्मा (रा. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षक स्वाती थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले. इंदर नन्हू शर्मा (रा. पाथर्डी) यांनी लोहार जातीचा दाखला कागदपत्रांसह पडताळणीसाठी समितीस सादर केला होता.

समितीने पुराव्यांची छाननी केल्यानंतर कागदपत्रांमध्ये बनावटपणा आढळून आला. त्यामुळे प्रकरण जिल्हा दक्षता समितीकडे वर्ग करण्यात आले. दक्षता समितीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. डी. पठाण यांनी शालेय व गृह चौकशी करून अहवाल जात पडताळणी समितीस सादर केला. त्यात इंदर नन्हू शर्मा व नन्हू मदन शर्मा यांच्या नावाचे लोहार जातीचे दाखले लाजपतवाडी (ता. श्रीरामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीनिशी आणले होते. दक्षता समितीने चौकशी केली असता या दोन्ही दाखल्यांच्या नोंदणी शाळेतील मूळ जनरल रजिस्टरला नव्हत्या.

त्यावरून इंदर नन्हू शर्मा यांनी खोटी-बनावट कागदपत्रे सादर करून जातपडताळणी समितीची दिशाभूल केल्याच्या दक्षता पथकाच्या अहवालावरून सिद्ध झाले. त्यामुळे इंदर शर्मा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा, असा आदेश जात पडताहणी समितीने केला होता. त्यानुसार जातीच्या दाखल्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा इंदर शर्मा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला.

SCROLL FOR NEXT