नगर; पुढारी वृत्तसेवा : तुमचे बँक खाते बंद झाले आहे, एसबीआय योनो बँकेतून बोलत आहे, अशी बतावणी करून माजी सैनिकाची सुमारे सहा लाखांनी फसवणूक झाली आहे. रविंद्रपाल जसवंत सिंग (वय 58 रा. जनरल अरूण वैद्य कॉलनी, जामखेड रोड, नगर) असे फसवणुक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांची पाच लाख 93 हजार 897 रूपयांची ऑनलाईन फसवणुक केली. सिंग यांच्या मोबाईल नंबरवर सोमवारी दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला.
समोरच्या व्यक्तीने एसबीआय योनो बँकेतून बोलतोय, असे सांगून, तुमचे एसबीआय अकाऊंट बंद झाले. ते चालू करायचे आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. अकाऊंट चालू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, अशी बातावणी करून सिंग यांच्याकडून ओटीपी घेतला. यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणुक केली. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.