अशोक लांडे खून प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदी 1 डिसेंबरपर्यंत उठविण्यात आली आहे. नगरमधील वास्तव्यादरम्यान त्यांना प्रत्येक सोमवारी कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी-शर्तींवर कोतकर यांची जिल्हाबंदी उठविली. 2 डिसेंबरला त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून संदीप कोतकर यांच्या उमेदवारीची चर्चा नगर शहरासह जिल्ह्यात सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर संदीप कोतकर यांनी जिल्हाबंदी उठविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
मुंबई उच्च न्यायालयात 21 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होती. मात्र कोतकर यांच्या वतीने न्यायालयाला विनंती करण्यात आली. त्यामुळे 18 ऑक्टोबरला न्या. पृथ्वीराज चव्हाण आणि न्या. रेवती डेरे यांच्यासमोर याबाबत सुनावणी घेण्यात आली.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून स्वत: किंवा पत्नी सुवर्णा यांना लढायचे आहे. त्यासाठी ही सवलत मिळावी, अशी विनंती कोतकर यांच्या वतीने उच्च न्यायालयास करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी उच्च न्यायालयाने संदीप कोतकर यांची जिल्हाबंदी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या काळासाठी उठविली आहे. मात्र या काळात कोतकर यांना प्रत्येक सोमवारी कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. 2 डिसेंबरला कोतकर यांच्या अपिलावर पुढील सुनावणी होणार आहे.