श्रीरामपुर; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांपासून चालू असलेला पाळण्यांचा तिढा रामनवमी सुरू होऊनही सुटलेला नाही. प्रांताधिकार्यांनी निर्णय होईपर्यंत पाळणे चालविण्यास नकारघंटा दिली असताही काल या ठिकाणी पाळणे सुरू होते. कोणतीही करवाई झाली तरी चालेल परंतु त्याच ठिकाणी पाळणे ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे थत्ते मैदानात ठेका घेणार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रांताधिकारी आज यावर काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
काल दुपारपासून रात्री उशीरापर्यंत या विषयाचा शेवट करायचाच, या उदात्त हेतुने यात्रा कमेटीने तहसिलदार यांच्या दालनात मुख्याधिकारी गणेश शिंदे,पो.नि.हर्षवर्धन गवळी यांच्याशी घेतलेल्या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. या संवेदनशील विषयावर उपविभागीय आधिकारीच निर्णय घेतील, असे तहसीलदार यांनी सांगीतले.
कामानिमित्त बाहेरगावी गेलेलेे उपविभागीय अधिकारी संध्याकाळी उशीरा आल्यावर पुन्हा बैठक घेण्यात आली. तेव्हा खासगी पाळणा चालकांनाही चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले, पण चर्चा निष्फळ झाल्याने उपविभागीय आधिकार्यांनी दोन्ही ठिकाणचे पाळणे बंद ठेवण्याचा निर्णय देउनही यात्रेच्या पहिल्याच दिवशी खासगी जागेतील पाळण्यांना जोरात सुरुवात झाल्याने प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करते? याकडे शहराचे लक्ष लागून आहे.