टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शासकिय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल करावीत, न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब केरू शिंदे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मौजे टाकळीभानमधील ग्रामपंचायत मालकीचे काही गट आहे? ते गट नियमाकुल करण्यास कुठलाही अडथळा नाही, मात्र अतिक्रमण नियमाकुल नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा घरकुलाचा ज्वलंत प्रश्न गेले, कित्येक वर्षांपासून प्रलंबीत आहे.
अतिक्रमण नियमाकुल झाल्याशिवाय घरकुलांचा प्रश्न सुटणार नाही. तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्कांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. टाकळीभान मधील जे शासकिय काही गट आहेत, ते गटातील नियमाकुल होण्यास कुठलाही प्रकारचा अडथळा राहिलेला नाही. यामध्ये गटातील शासनाने त्वरित नियमाप्रमाणे नियमाकुल करावेत.
महसूल विभागाकडील 4 एप्रिल 2002 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासकीय जागेवरील निवासी व वन्य प्रयोजनासाठी अतिक्रमणे नियमित करावेत, ही अतिक्रमणे नियमाकूल न केल्यास टाकळीभान तलाठी कार्यालयासमोर दिनांक 13 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 11 वा आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा बापूसाहेब शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.