अहमदनगर

नगर : पाथर्डीत एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री विखे

अमृता चौगुले

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  दुष्काळी तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी एमआयडीसी, आयटीपार्क सारखे प्रकल्प उभारण्यासाठी जागा, पाण्यासह हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी लागला तरी देण्यास तयार आहोत. यासाठी तालुक्याच्या विकासाची एक ब्ल्यू प्रिंट तयार करा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठ मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बाबूराव भापसे यांचा पुण्यस्मरण सोहळा, तसेच विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार प्रसाद लाड यांचा नागरी सत्कार व डिजिटल वर्गाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले, शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे उच्च शिक्षण मिळावे, या हेतूने एक वर्षात चार हजार वर्ग डिजिटल करून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सर्वोत्तम सोय उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. माजी आमदार बाबूराव भापसे यांनी तालुक्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. उपेक्षित आणि कष्टकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नगर चळवळीचा जिल्हा असून सहकार चळवळ उभारण्यासाठी या जिल्ह्यातील अनेक राजकारण्यांचा सहभाग राहिला आहे. त्यातील ते एक होते, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, श्री वृद्धेश्वर देवस्थानचा ब वर्गात समावेश करावा, त्याचबरोबर श्रीक्षेत्र मढी चैतन्य कानिफनाथ देवस्थान ते श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान हे तीन किलोमीटरचे हवाई अंतर असून, या ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हे काम सार्थकी लागावे म्हणून मंत्री विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांनी प्रयत्न करावेत. याप्रसंगी क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज कंपनीजच्या एमडी नीता प्रसाद लाड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ लवांडे, अजय रक्ताटे, सुनील साखरे, बंडू बोरुडे, राहुल कारखेले, संभाजीराव वाघ, नंदकुमार शेळके, चारुदत्त वाघ, शेषराव कचरे, रामकिसन काकडे, पृथ्वीराज आठरे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT