राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुरूवारी झालेल्या 41.8 मिमी पावसाने शहरासह ग्रामीण भागामध्ये रस्त्यावर अक्षरशः चार्या वाहिल्या. वाढलेले अतिक्रमण तसेच ओढे नाले बुजविल्याने अनेक दुकानांसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. सलग दोन तास ढगफुटी सदृश पडलेल्या पावसाने शहरामध्ये वाहनेही पाण्यामध्ये बुडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घराबाहेरील वाहने पाण्यात सापडली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. अधिक पावसाने पिकांना चांगला फटका बसल्याचे चित्र आहे. राहुरी शहरासह बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, वांबोरी, सात्रळ, सोनगाव, ताहाराबाद, म्हैसगाव, गुहा, तांभेरे, कोल्हार खुर्द, मानोरी, वळण, ब्राम्हणी, बाभूळगाव, मुळानगर आदी सर्च गावांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. सलग तीन तास सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर जणू चार्या अवतरल्या होत्या.
सर्वत्र पाणीबाणी अशी परिस्थिती निर्माण होऊन रस्त्यांवर वाहने पाण्यावर तरंगण्याच्या अवस्थेत उभी होती. सलग पडणार्या पावसाने पिकांनाही तडाखा दिल्याचे विदारक चित्र आहे. पावसाची परिस्थिती पाहता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी तातडीने तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देत गावांमधील परिस्थितीवर नियंत्रणासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. एकीकडे मुळा धरण तुडूंब झालेले असताना वाढलेली पाणी आवक पाहता 10 ते 25 हजार क्यूसेक दरम्यान कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सरासरी 105 मिमी
राहुरी मंडळामध्ये राहुरी 128.5 मिमी, सात्रळ 113.4 मिमी, ताहाराबाद 128.4 मिमी, देवळाली प्रवरा 96.7 मिमी, टाकळीमिया 105.0 मिमी, ब्राम्हणी 83.2 मिमी, वांबोरी 85.3 मिमी अशी नोंद मान्सून काळात झाली आहे. सरासरी 105 मिमी पाऊस राहुरी परिसरामध्ये पडला तर गुरूवारी 41.8 मिमी नोंद झाली.