कोळगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदा कोळगाव परिसरात जोरदार पाऊस होऊनही ग्रामस्थांना एक आठवड्यापासून पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना हिवाळ्यात भंटकंती करण्याची वेळी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आली आहे.
ग्रामस्थांची पाण्यासाठी कायमच वर्षभर पायपीट सुरू असते. एक दोन आठवडे पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा दोन दोन आठवडे पाणी येत नाही. पाणीयोजना होऊनही अद्यापि कार्यान्वित झाली नाही. ग्रामस्थांनी किती काळ हाल सोसायचे? सरपंच आणि उपसरपंचाचे गावाकडे लक्ष नाही. गावामध्ये ते दिसतच नाहीत. गावासाठी ते हरवले आहेत अशी तक्रार माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी केली आहे.
लगड यांनी सांगितले की, गावात पिण्याच्या पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाणीपुरवठा करणार्या पाणी योजनेत सतत बिघाड होत असून, ग्रामपंचायतकडून त्याची वेळेवर दुरुस्ती होत नाही. परिणामी गावात कायमच पाण्याची निर्जळी होते.
रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. गावामध्ये ठिकठिकाणी झाडे उगवलेले आहे. ती तोडलेली नाही.
सांडपाणी रस्त्यावरच सोडले जाते. त्याबद्दलही व्यवस्था नाही. दोन दोन आठवडे घंटागाडी गावांमध्ये फिरत नसल्याने घरांमध्ये व व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. घंटागाडी फिरत नसल्याने कचरा व्यवस्थापन होत नाही. कचर्याची विल्हेवाट कोठे लावायची हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. कचरा डेपोची अद्यापि निश्चिती नाही.
पथदिव्यांची वीज दिवसभर चालू असते. त्यासाठी फ्युज बसवलेली नाही. ग्रामसभेमध्ये घेतलेल्या ठरावानुसार कार्यवाही केली जात नाही. लोकांनी मोठ्या विश्वासाने ज्या सदस्यांना निवडून दिले. त्यांचे आपापल्या वार्डमध्ये लक्ष नाही. ग्रामसेवकावर ग्रामपंचायतीचा अंकुश नसल्याने कामे वेळेवर होत नाही. या सर्व गोष्टीमुळे जनतेमध्ये नाराजी असून ग्रामपंचायतचा कारभार जर सुधारला नाही तर त्या विरोधात ग्रामस्थांसह ग्रामपंचायत वर मोर्चा काढण्याचा इशारा माजी सभापती लगड यांनी दिला.
स्मशानभूमीची दुरवस्था
गावातील स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून ग्रामपंचायतचे त्याकडे लक्ष नाही. दोन वर्षांपासून अंत्यविधीसाठी असणारी लोखंडी जाळी एका बाजूने तुटली आहे. तेथे पुरेशी वीजव्यवस्था नाही. तेथील बल्ब, वायर वारंवार चोरीस जाते.