अहमदनगर

अहमदनगर : खरीप ’मातीत’ तर रब्बीवर दुष्काळाचे ’मळभ’

अमृता चौगुले

अहमदनगर तालुका : नगर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने भीषण संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम वाया जाणार असून रब्बी हंगामावर दुष्काळाचे ढग मंडारत आहेत. पाणी चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला असून विहिरी, तलाव, बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. खरीप पिकांची दुर्दशा झालेली पहावयास मिळते. संपूर्ण नगर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून बळीराजा मात्र चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

खरीप हंगामातील बाजरी, मूग, सोयाबीन पिकांची पावसाअभावी वाताहात झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने हुलकावणी दिल्याने मुगाच्या पेरणीत मोठी घट झाली होती. आर्द्रा नक्षत्रात बरसलेल्या थोड्याफार सरींवर शेतकर्‍यांनी पेरणी ऊरकली होती. पेरणी योग्य पाऊस झालाच नाही त्यातच पेरणीनंतर देखील पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिके हिरवी दिसत असली तरी पाण्यासाठी ताणल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे तर काही ठिकाणी पिके पावसा अभावी कोमेजून जात आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

पावसाळ्याचे तीन महिने उलटली तरी पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी हंगामावर देखील दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. तालुक्यातील बहुतांशी भागातील विहिरी, तलाव, बंधारे, कुपनलिका कोरडे ठाक पडले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे चार्‍याचा प्रश्न देखील भेडसावत असून पशुधन कसे जागवावे या विवंचनेत पशुपालक आहेत.

नगर तालुका पर्जन्यछायेचा म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे. मागील वर्षी तर अतिवृष्टीने हाहाकार घातला होता. तालुक्यात परतीचा मान्सून चांगल्या प्रमाणात कोसळतो. आता परतीच्या मान्सूनवर शेतकरी आस लावून बसला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. तर चालू वर्षी वरूणराजाने साफ निराशा केली आहे.

रिमझिम पावसावरच सुमारे साठ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झालेल्या आहेत. परंतु पावसाने हिरमोड केल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी पिके करपली जात असून उत्पन्नाला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेल्या तालुक्यात यंदा मात्र लाल कांदा दिसणार की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. लाल कांद्याचे रोपं टाकण्यासाठी पाणी शिल्लक नसल्याने त्याचा मोठा परिणाम लाल कांद्याचे उत्पादनावर होणार आहे.

खिशात पैसा नाही… काळ्या आईच्या उदरातून मिळणारे उत्पन्न नाही… विहिरी, तलाव कोरडे ठाक… पाण्याची दुर्भिक्ष… चार्‍याचा उद्भवलेला प्रश्न असे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. संपूर्ण तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून बळीराजा मात्र परतीचा मान्सून चांगला बरसेल या आशेवर आकाशाकडे आस लावून बसला आहे.

तेरा गावांनी टँकरने पाणीपुरवठा

तालुक्यातील मदडगाव, सांडवे, भोयरे पठार, दशमी गव्हाण, भोयरे खुर्द, बहिरवाडी, नारायण डोहो, माथणी /बाळेवाडी, उक्कडगाव, ससेवाडी, कोल्हेवाडी, इमामपूर, चिचोंडी पाटील या 13 गावांनी ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच इतर गावांनी ही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवतच आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होणार असून यावरून तालुक्यातील परिस्थितीची कल्पना येते.

गर्भगिरीच्या टेकड्यांनाही पावसाची प्रतीक्षा

नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगर रांगा आढळून येतात. यामध्ये औषधी वनस्पतींचा खजिना तर विविध वन्यप्राणी, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार आढळतो. पावसाळ्यात हिरवाईनी नटणार्‍या गर्भगिरी डोंगर रांगांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. डोंगरगण, इमामपूर, आगडगाव, देवगाव, गुंडेगाव, गोरक्षनाथ गड ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजून जात असतात मात्र पावसाअभावी सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

जीवन जगण्यासाठी बळीराजाची धडपड

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पाणी चार्‍या वाचून पशुधन जगवणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी तसेच सद्यस्थिती पाहता शेतीतून उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे देखील अवघड झाले आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने तर चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थितीने बळीराजा खचून गेला आहे.

– सोपान आव्हाड, शेतकरी, पांगरमल

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT