अहमदनगर

नगर : वडगाव पान-झगडे फाटा रस्त्याची झाली चाळण

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : सर्वाधिक रहदारीचा वडगाव पान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिक-ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा, अशी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांसह साईभक्त प्रवाशी संतप्त झाले आहेत. रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता अनेक महिन्यांपासून मंजूर झाला आहे. वर्कऑर्डरसुद्धा निघाल्याचे सा. बां. च्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते. मात्र या रस्त्याचे काम करण्यात नेमकं घोडं अडलं कुठं? असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून उपस्थित होत आहे.

कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार या मोठ्या शहरांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. वडगाव पान फाटा ते कोपरगाव या मार्गाचा अवजड वाहतूक करणारे वाहन चालक वापर करतात. संगमनेर व कोपरगाव तालुक्याचे शेतकरी शेतमाल संगमनेरला आणण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, मात्र गेली अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे वडगावपान फाट्यापासून निळवंडे गाव हद्दीपर्यंत ठिक-ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून खड्डे ठेकेदार थातुर- मातुर काम करून बुजवून वाहन चालकांची बोळवण करीत असल्याचे दिसते.

वडगाव पानफाट्यापासून एक की, मी अंतरापर्यंत डांबरीकरण झालेले आहे. मात्र तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साठवण तलावापासून निळवंडे गावाच्या सरहद्दीपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच करुले ते तळेगावची भागवतवाडीपर्यंत रस्ता चांगला असून पुढे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, पोहेगाव, झगडे फाटा चांदेकासारे ते पुणतांबा फाटा या मार्गावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांच्या वाहनांचे पाठे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

तर चारचाकी आणि दुचाकी वाहने अक्षरशः खिळखिळी झाली आहेत.या खड्ड्यांतून मार्ग काढताना अनेक दुचाकी स्वरांचे मणके ढिल्ले झाले आहे. तर एखाद्या आजारी व्यक्तीला या मार्गाने दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्याचा आजार आपोआप बरा होतो. नाहीतर त्याला देवा घरी जावे लागते. एवढी दुरावस्था या मार्गाची झालेली आहे.

वडगावपान फाटा, निळवंडे, कवठे कमळेश्वर, काकडी विमानतळ मार्गे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग म्हणून पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातून येणारे साईभक्त यामार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहे. मात्र निळवंडे शिवारातील एका पेट्रोलपंपाजवळ पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांकडून अनेकवेळा अपघात सुद्धा झालेले आहेत. या अपघातामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे की नाही? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गामधून उपस्थित होत आहे.

या रस्त्याबाबत राजकीय नेत्यांची अनास्था

वडगावपान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातून सर्वच गावांचे राजकीय नेते सुद्धा मार्ग काढताना तारेवरची कसरत करीत आहे. मात्र आपले राजकीय वर्चस्व अबाधित राहण्यासाठी या मार्गावर असणार्‍या कुठल्याच गावातील राजकीय पक्षाचे नेते आवाज उठविण्यास पुढाकार घेत नाहीत. पुढाकार घेतला तर आपल राजकीय भवितव्य धोक्यात येईल, म्हणूनच कोणीही हा रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात आवाज उठविताना दिसत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगलेच फावले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT