अहमदनगर

नगर : मुन्नाभाई पोलिस कोठडीत ; त्यासोबत डॉ. दिलीप भोसही आरोपीच्या पिंजर्‍यात

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : रूईछत्तीसीत कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर बोगस उपचार करणार्‍या डॉ. ज्ञानदेव पवार याची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. पवार याने ज्या डॉ. दिलीप भोस यांच्या नावाचा बोर्ड लावला त्यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
बुधवारी (दि.1) अटक केलेल्या बोगस डॉक्टर ज्ञानदेव निवृत्ती पवारला न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.4) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नगर तालुक्यात वैद्यकीय सेवा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना स्वतःच्या वैद्यकीय पदवीच्या आधारावर ज्ञानदेव पवार याला दवाखाना चालविण्यास प्रोत्साहन दिले म्हणून डॉ.दिलीप बाबासाहेब भोस (रा. घोगरगाव, ता.श्रीगोंदा) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात मान्यता असलेली कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसताना हा डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करीत होता. पवार विरोधात अनेकदा तक्रारी होवूनही, आरोग्य विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. रुईछत्तीसी येथील एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.  प्रसुतीदरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वा.ए.चव्हाण करीत आहेत.

SCROLL FOR NEXT