अहमदनगर

Ganeshotsav News : उत्सवांमध्ये डिजेचा वापर करु नका : राकेश ओला

अमृता चौगुले

संगमनेर/ संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : शांतता कमिटीचा उद्देश उत्सव शांततेत व्हावे हा आहे. यंदा दोन्ही समाजाचे उत्सव एकाच दिवशी आल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. डिजेचा वापर न करता, सामाजिक ऐक्य जपावे. मंडळांनी परवानगी घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा. पर्यावरणपुरक आरासवर भर देवून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. गणेशोत्सव व ईद- ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रशासकीय भवन येथे शातंता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, विश्वास मुर्तडक, अमोल खताळ, किशोर पवार, जावेद जहागिरदार, नुरमहमंद शेख, मनिष मालपाणी, निखिल पापडेजा, कैलास वाकचौरे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, अ‍ॅड. सुहास आहेर, राजेंद्र देशमुख, पो. नि. भगवान मथूरे, पो. नि. ढुमणे उपस्थित होते. सुरुवातीला विविध विषयांवर चर्चा होताना माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक , अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी बैठकीचे मागिल प्रोसडिंगवर अधिकार्‍यांनी काय कारवाई केली, असा मुद्दा उपस्थित केला. उत्सव तोंडावर आल्यानंतर बैठक घेतल्याने नाराजी व्यक्त केली. याला उपस्थित सदस्यांनी पाठींबा दर्शवत प्रोसडिंग वाचा, असा आवाज उठविला.

यावर पोलिस उपाधीक्षक वाकचौरे यांनी मध्यस्थी करीत चर्चा सुरू राहू द्या, तुमचे प्रश्न मांडा, त्यावर लगेच मार्ग काढू, असे सांगितले. यावर उपस्थित सदस्यांनी अनेकदा प्रश्न मांडले, त्याची सोडवणूक होत नाही, असे सांगून वीज वितरण कंपनीचे अधिकारी सहकार्य करीत नाहीत. सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडीत केला जातो. पोलिस रात्री लवकर दुकाने बंद करायला लावतात. उत्सव काळात रात्री 12 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहू द्या. शहरात रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, तात्पुरते वीज कनेक्शन द्या.

एकाच दिवशी दोन्ही समाजाच्या मिरवणुका निघणार असतील तर, दुसर्‍या समाजाच्या मिरवणुकीचे स्वागत करावे, असे सुचविले, तर काही सदस्यांनी ही मिरवणूक दुसर्‍या दिवशी काढा, अशी विनंती केली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, गणेश विसर्जन लक्षात घेता प्रवरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली, असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. कैलास वाकचौरे, किशोर पवार, राजेंद्र देशमुख, अमर कतारी, नुरमहमंद शेख, अमोल खताळ, मनिष मालपाणी व करूलेचे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी प्रश्न मांडले.

'वीज वितरण'वर व्यक्त केली नाराजी

शांतता कमिटीच्या बैठकीत प्रवरा नदीला विसर्जन काळात पाणी सोडा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, शहरातील खड्डे बुजवा असे प्रश्न मांडले जात होते, मात्र वीज वितरणबाबत प्रश्न उपस्थित करताना गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. एकूणच वीज 'वितरण'च्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT