वाळकी; पुढारी वृत्तसेवा : त्यांच्या कार्यकर्त्याच्या अकार्यक्षमतेमुळे बंद पडलेल्या घोसपुरी पाणी योजनेच्या 52 लाख 91 हजारांची वीज बिलाची थकबाकी भरून, गेल्या नऊ वर्षांपासून योजना सक्षमपणे चालवून आज ती नफ्यात आणली आहे. योजनेकडे 90 लाख 59 हजारांची एफडी आणि बँकेत 24-25 लाख शिल्लक, असे 1 कोटी 15 लाख रुपये आहेत. अतिशय पारदर्शकपणे योजना चालविल्याचा हा पुरावा आहे. हेच त्यांना खुपत असल्याने त्यांनी हे उद्योग सुरू केले आहेत. केवळ राजकारणापायी योजना बंद पाडण्याचे पाप करू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा पलटवार माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावर केला.
कर्डिले समर्थकांनी आणि काही गावांच्या सरपंचांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना माजी मंत्री कर्डिले यांच्या लेटरपॅडवर निवेदन देऊन घोसपुरी योजनेत गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यास कार्ले यांनी गुरुवारी (दि.29) सकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी महाविकास आघाडीचे प्रताप पाटील शेळके, बाळासाहेब हराळ, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, माजी सभापती संदीप गुंड, रामदास भोर, पोपट निमसे, प्रवीण गोरे आदी उपस्थित होते.
कार्ले म्हणाले, या चौकशीचे आपण स्वागत करतो. या पूर्वीही कर्डिले आमदार असताना त्यांनी 2017 मध्ये विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून चौकशी लावली, त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. नऊ वर्षापूर्वी योजना बंद असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा होऊन योजनेची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. ती केवळ यांचा कार्यकर्ता अकार्यक्षम होता म्हणून. त्यानंतर बंद पडलेली योजना आपण सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक व शिवसैनिकांच्या मदतीने सक्षमपणे चालविली आहे.
सुरुवातीला आठ महिने मोठे कष्ट घेऊन आम्ही सर्वांनी ही योजना सुरळीत सुरू केली. टाकीतील तब्बल 11 टन गाळ काढला. लोकांना योजना चांगली चालू शकते हा विश्वास दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीही नियमित बिले भरू लागल्या. योजनेमुळे लाभार्थी गावातील माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवता आला याचे समाधान आहे. यांना आता योजनेकडे शिल्लक असलेला 1 कोटी 15 लाखांचा निधी दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी राजकारण सुरु केले आहे. पण जनतेला सर्व माहित आहे. यांच्या या उद्योगांमुळे योजना बंद पडली तर त्यास निवेदनावर सह्या करणारे यांचे समर्थक आणि स्वत: कर्डिले हेच जबाबदार राहतील, असेही ते म्हणाले.
योजनेच्या वेस्टेज जाणार्या पाण्यातून शेतकर्यांना पैसे घेऊ रितसर पावत्या देऊन टँकरने पाणी देत योजनेचे उत्पन्न वाढविले, यात पारदर्शकता असावी, म्हणून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. शिल्लक पाणी नगर कारखान्यासह काहींना व्यावसायिक दराने दिले. दुरुस्तीची कामे अंदाजपत्रकापेक्षा कमी दरात करात योजनेच्या पैशांची बचत केली. अवघ्या सात कर्मचार्यांच्या मदतीने योजना सुरळीत सुरू आहे.
हा सर्व हिशेब सर्व सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी यांच्या व्हॉटसअॅप ग्रुप वर वेळोवेळी दिला आहे. योजनेचे लेखापरीक्षणही केले आहे. योजनेच्या पैशांची अजून बचत व्हावी, यासाठी घोसपुरी येथे सौरउर्जा प्रकल्प राबविण्याचा मानस होता. त्यास सरकारची मंजुरीही मिळाली होती. मात्र त्यांना जनतेचे हित नव्हे, तर आपले राजकारण महत्त्वाचे वाटत आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो, असे सांगत त्यांच्या बुर्हाणनगर पाणी योजनेचे पाणी कुठे मुरते आणि बाजार समितीत ते काय दिवे लावत आहेत, हे सर्व आपण लवकरच उघडे करणार असल्याचा इशाराही कार्ले यांनी दिला.
'बुर्हाणनगर' व 'घोसपुरी' या दोन्ही योजना मंजूर करून आणल्याचे कर्डिल सांगते असले तरी, हे साफ खोटे आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी राज्यभरात अनेक योजना मंजूर केल्या. यात या दोन योजना आहेत. योजना मंजूर करण्याचे श्रेय घेण्याअगोदर घोसपुरी आम्ही चालवून दाखविली. तुम्ही 'बुर्हाणनगर' चालवून दाखवा, असे खुले आव्हान त्यांनी कर्डिले यांना दिले.
हेही वाचा