नगर : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे-डॉ. प्रकाश आंबेडकर यांची युती हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. व्यक्तिगत संबंध महाविकास आघाडीशी जोडू नका. विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची दोन फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिली. आ. पटोले यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यावेळी उपस्थित होते.
आ. पटोले म्हणाले, देशाची लढाई आज बेरोजगारी, महागाई, शेतकर्यांच्या समस्यांशी सुरू आहे. आमच्या दृष्टी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सध्या देश हुकुमशाहीकडे चालला आहे. सामान्य माणसांसह माध्यमांचा आवाज दाबला जात आहे. देशात लोकशाही राहिली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर एक माध्यम वाहिनीने केलेला माहितीपट दाखविण्यास केंद्र सरकार परवानगी देत नाही. राहुल गांधी यांची बदनामी करण्यासाठी हजारो कोटींची उधळपट्टी सरकारने केली असा आरोप करत ते म्हणाले, राज्यपाल हटाव ही आमची आग्रही भूमिका आहे. महापुरूषांचा अवमान करणार्यांना व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. राज्यपाल पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यातून भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.