अहमदनगर

गुन्हेगारांना सत्तेकडून अभय मिळतेय का? बाळासाहेब थोरातांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खुनाबाबत चर्चा करताना नगरमधील या राजकीय गुन्हेगारीवर कोरडे ओढत आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत सरकारवर आणि भाजपवर हल्लाबोल केला. राज्य तुमचे, गृहमंत्री तुमचा आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच, हे चिंता वाढविणारे आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले. ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अंकुश चत्तर खून प्रकरणावरून सरकारला आज धारेवर धरले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत बोलताना थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आणि सरकारला नगरमधील गुन्हेगारीवरून धारेवर धरले. ते म्हणाले, की राज्य तुमचे आहे. गृहमंत्री तुमचे आहेत. खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहेत आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला असे वाटते, की गुन्हेगारांना सत्तेकडून अभय मिळतेय की काय? गृहमंत्री फडणवीस यांना संबोधून थोरात म्हणाले, की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथे उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराला पक्षसुद्धा नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आमदार थोरात यांना अंकुश चत्तर हत्याकांडाबाबतची माहिती दिली. या माहितीच्या आधारे थोरात यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा केली. गुन्हेगाराची जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

'सीसीटीव्ही'मुळे एक आरोपी निष्पन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम व जुन्नरमधून काल (सोमवारी) अटक केली; मात्र सीसीटीव्हीत दिसत असलेला राजू फुलारी हा आरोपी मोकाट असला, तरी सीसीटीव्ही फुटेजमुळे आणखी एक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.
चत्तर हत्याकांडातील मुख्य आरोपी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सूरज ऊर्फ विकी राजन कांबळे या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम येथून ताब्यात घेतले. त्यानंतर मिथुन सुनील धोत्रे व एका अल्पवयीन मुलाला बेल्हे भागातील रांजणी (ता.जुन्नर) येथून ताब्यात घेतले.

संशयितांची धरपकड
अंकुश चत्तर यांच्या खुनाचा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे आणखी एक आरोपी निष्पन्न झाला आहे. राजू फुलारीसह त्या आणखी एकाचा शोध पोलिस घेत आहेत. चौकशीसाठी संशयितांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT