नगर : पुढारी वृत्तसेवा
केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील जिल्हाबंदी हटविण्याचा माजी महापौर संदीप कोतकर यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी हा निकाल दिल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी दिली.
माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी शिथिल करण्याचा आदेश दिला आहे.
मात्र, संदीप कोतकर केडगाव दुहेरी हत्याकांडातही संशयित आरोपी आहेत. या खटल्यातही न्यायालयाने त्यांना सुनावणीच्या तारखेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे. ही जिल्हाबंदी हटविण्याची मागणी त्यांनी येथील जिल्हा न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सुनावणी पूर्ण झाली.
दरम्यान, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर शुक्रवारी निकाल देत संदीप कोतकर यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. कोतकर यांच्या वतीने व्यवसायासाठी जिल्हाबंदी हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यात निवडणुकीचे कारण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे लांडे खून प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा परिणामही या याचिकेवर झाला नाही. परिणामी न्यायालयाने संदीप कोतकर यांचा जिल्हाबंदी उठविण्याचा अर्ज फेटाळून लावल्याचे अॅड. पवार यांनी सांगितले.
केडगाव दुहेरी हत्याकांड झाले, त्या वेळी निवडणूक होती. ऐन निवडणुकीच्या काळात हे हत्याकांड झाले होते. आतादेखील विधानसभेची निवडणूक असून संशयित आरोपींना जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे अॅड. अर्जुन पवार यांनी केला.