अहमदनगर

एजन्सीने काय घरात बसून सर्व्हे केला का? आमदार प्राजक्त तनपुरे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन पाणी योजनेमध्ये सावळागोंधळ असून, जलवाहिनी टाकण्याचा मूळ प्रस्ताव कमी किलोमीटरचा आणि वाढीव प्रस्ताव दुप्पट आणि तिप्पट किलोमीटरचा असा सर्व्हे करणार्‍या एजन्सीवर काय कारवाई केली? हा सर्व अजब प्रकार असून, सर्व्हे करणार्‍या एजन्सीने काय घरात बसून सर्व्हे केला का? याविषयी मी विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याचा इशारा अधिकार्‍यांना आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला. मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजनेचे काम संथ गतीने चालले असून, ही योजना तातडीने पूर्ण करत योजनेतील समाविष्ट गावांना येत्या उन्हाळ्यापूर्वी पाणी द्या, असे आदेश आज आ. तनपुरे यांनी या योजनेशी संबंधित अधिकार्‍यांना दिले. दीडशे कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याच बैठकीत तनपुरे यांनी शेलक्या शब्दांत राज्य व केंद्र सरकारवर टीका केली.

या वेळी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. पी. धगधगे, अनिल सानप, गटशिक्षणाधिकारी अनिल भवर, रफिक शेख, अमोल वाघ, राहुल गवळी, राजेंद्र म्हस्के, इलियास शेख, भीमराव सोनवणे, पिनू मुळे, विलास टेमकर, अंबादास डमाळे, जगन्नाथ लोंढे, संदीप देशमुख, गौतम कराळे, संतोष घोरपडे, नितीन लोमटे व योजनेशी संबंधित गावातील नागरिक उपस्थित होते. या बैठकीत योजनेचे पाइप निकृष्ट दर्जाचे आहेत. या संदर्भात जो सर्व्हे करण्यात आला, तो चुकीचा करण्यात आला. तसेच काम संथ गतीने चालू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर आ. तनपुरे म्हणाले की, योजना सुरू करण्यापूर्वी गावांतर्गत जलवाहिनीचा सर्व्हे केला.

मात्र, अगोदर चार किलोमीटर पाइप टाकावे लागतील असे इस्टिमेट बनवले. मात्र, त्यानंतर नऊ किलोमीटर वाढीव पाइपचा प्रस्ताव मंजुरीसाठी टाकण्यात आला. योजनेत ज्या अडचणी आहेत त्या दूर करा. घर घर जल है या पद्धतीने ही योजना व्हायला हवी होती; मात्र हर घर जल नही या पद्धतीने योजनेचे काम चालू आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याने आम्ही या योजनेवर विश्वास ठेवला. मात्र, गतिमान सरकारच्या काळात आपण वावरत असूनही हे काम मात्र संथ गतीने चालू असल्याचा आरोप आ. तनपुरे यांनी केला.

'त्यांना' पाणीपुरवठा मंत्री करू!
एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दिवसातून दोन वेळा भरली जाईल, असे अधिकारी सांगतात. जे या पद्धतीने टाकी भरून देतील त्या अधिकार्‍यांना आमच्या सरकारच्या काळात आम्ही पाणीपुरवठामंत्री करू, असे आ. तनपुरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT