कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरात सुरु असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करून विकासकामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विकासकामांच्या पाहणी दरम्यान उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत. गुरुवार (दि.26) रोजी आ. काळे यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये 131.24 कोटी निधीतून सुरु असलेल्लेया ब्रिजलाल नगर येथील पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तसेच 1 कोटी निधीतून सुरु असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या उद्यान सुशोभिकरण आदी कामांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना सूचना करतांना कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देवून आराखड्यानुसारच कामे करा. संबंधित अधिकार्याच्या परवानगीशिवाय आराखड्यात बदल करू नका, पाणी पुरवठ्याच्या टाकीतून सगळ्या भागांना पाणी पोहोचेल पाहिजे असे नियोजन करा, आदी सूचना आ. काळे यांनी यावेळी दिल्या. यावेळी पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, मेहमूद सय्यद, कृष्णा आढाव उपस्थित होते.