संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर पालिकेची शहरात प्लास्टिक पिशव्या विरोधातील मोहीम थंडावली आहे. याचा फायदा व्यावसायिक व व्यापारी घेत असून सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यामुळे शहरात आता ठिकठिकाणी प्लास्टिक कचर्याचे ढीग पाहवयास मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः 'सिंगल युज प्लास्टिक' बाबत चिंता व्यक्त करून यावर संपूर्ण बंदी घातली आहे. विविध राज्यात प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक असून याचा वापर थांबविण्यासाठी 'सिंगल युज प्लास्टिकवर' बंदी घातली असली तरी आजही शहरात व ग्रामीण भागात सर्रास प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहे.
कापड दुकान, किराणा दुकान, फळ विक्रेते, भेळ विक्रेते, हॉटेल चालक, औषध विक्रेते, आदीसह इतर व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या वापरत आहे. राज्य शासनाने यावर निर्बंध आणले असून शहरात नगर परिषद, गाव पातळीवर ग्रामपंचायतींना यावर तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र सुरुवातीला नगर पालिकेने दिखाऊ कारवाई केल्यानंतर आता गेल्या अनेक महिन्यांपासून कारवाई थंडावली आहे. आता सर्वत्र प्लास्टिक पिशव्याचा वापर खुले आम होत आहे.
नविन नगर रोड, बाजारपेठ, नेहरू चौक, मेन रोड, दिल्ली नाका, सय्यद बाबा चौक नाशिक रोड या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नगर परिषद हद्दीत फेरीवाले व हातगाडी वाले आदिंकडून पालिकेकडून कर वसुली केली जात आहे. याच फेरीवाल्यांकडून प्लास्टिक वाप अधिक होत आहे. याकडे पालिका मात्र कानाडोळा करीत आहेत.
पालिकेला करातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत आहे. यासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. कचरा गोळा करण्यासाठीही नाशिक येथील आदर्श सर्व्हिसेसला ठेका देण्यात आला आहे. गेल्या नऊ ते दहा वर्षापासून एकच ठेकेदाराला काम पालिका देत आहे. पाण्याचा आरो प्लँटही एकाच ठेकेदाराला देण्यात आला असून पालिकेचे सर्वच ठेकेदार नाशिक जिल्ह्यातील आहे.
पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्लास्टिक वापरावर कारवाई करत नाही. मुख्याधिकारी यांचा वचक राहिला नाही. यामुळे शहरात उपनगरात अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या व कचरा साचलेला आहे. उपनगरातील काही भागात आजही कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास, दुर्गंधी, अस्वच्छता ही संगमनेरची ओळख बनत चालली आहे. गेल्या दीड वर्षांपासून पालिकेत प्रशासक राज आहे. याचा फायदा अधिकारी कर्मचारी घेत आहे. नागरिकांना पालिकेत फारसा प्रतिसाद दिला जात नाही. नगरसेवक नसल्याने नागरिकांची फरफट सुरू आहे.
पालिकेचा संगमनेर खुर्द परिसरात कचरा डेपो असून या ठिकाणी दररोज शहरातून गोळा केलेला कचरा आणला जातो. डेपोत कचर्याचे ढीग साचले असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. महामार्गालगत हा कचरा डेपो असल्याने येणारे जाणारे व आजूबाजूचे नागरिक यांना मोठा त्रास होतो. वारंवार मागणी करूनही पालिका काहीच मार्ग काढत नाही.