कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सैन्य दलात सेवेत असलेले जवान दीपक कृष्णा आहेर यांचे अल्पशः आजाराने पुणे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार (दि.10) रोजी सकाळी 10 वा. कोळपेवाडी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 23 वर्षांपासून सैन्य दलात सेवेत असलेले दीपक आहेर सध्या डेहराडून येथे सेवेत होते.
देशातील हरीयाणा, डेहराडून, राजस्थान, लेह, अशा विविध ठिकाणी देशसेवा केली. त्यांनी 18 वर्षे सेवा पूर्ण करून 5 वर्षे अधिक सेवा वाढविली होती, हे विशेष. सेवेचे एक वर्ष बाकी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा (9 वर्षे), मुलगी (14 वर्षे), आई, वडील, भाऊ, भावजयी, चुलते असा मोठा परिवार आहे. पुणे मिलिटरी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना रविवारी रात्री 3 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोळपेवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल माजी आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :