अहमदनगर

चितळी : सोयाबीन कापणीवर पावसाचे गडद संकट

अमृता चौगुले

चितळी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाचा खंड, यानंतर झालेल्या अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झालेली आहे. यानंतर शिल्लक राहिलेल्या सोयाबीन पिकांची कापणी सुरु असताना तीन दिवसापासून पाऊस झाला आहे. या पावसामुळे संकटाची मालिका सुरु असलेल्या शेतकर्‍यांची धावपळ होत आहे. परतीचा मान्सून, काढणीला आलेले सोयाबीन, वाढलेले मजुरांचे दर, तेही मिळवण्यासाठी चालू असलेली तारेवरची रोजची कसरत, मळणी मशीन, हार्वेस्टिंग मशीन, मिळविण्यासाठी चालू असलेली शेतकरी वर्गाची दमछाक, हे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. रोज दाटून येणार्‍या काळ्या ढगांच्या गर्दीमुळे मात्र शेतकरी वर्गाचा काळजाचा ठोका चुकत आहे.

मागील वर्षी बाजारभावात सोयाबीनने उच्चांकी गाठली. शेतकरी वर्गासाठी सुवर्णमध्य ठरलेले सोयाबीन कर्जाचे ओझे हलके करण्यास काही प्रमाणात आधार ठरले. त्यामुळे चालू खरीप हंगामात जिल्ह्यात दीडलाख हेक्टरच्या जवळपास सोयाबीन चा पेरा झाला आहे. मात्र परतीच्या प्रवासाला निघालेला पाऊस त्यावर काढणीला आलेल्या सोयाबीनवर विरजण पाडतो की काय? या चक्रव्यूहात शेतकरी सापडलेला आहे. कोविड महामारीतून सावरत चाललेला शेतकरी वर्ग चालू वर्षी सोयाबीन व पांढरे सोने म्हणून उदयास आलेल्या कापूस पिकावर आपली सर्व मदार ठेवून, पुंजी पणाला लावून सध्या काढणीच्या तयारीत आहे.

सर्वर्त्तोपरी काळजी घेऊन ही अनेक सोयाबीन पावसाच्या पाण्यात भिजले देखील असून, दाण्यांना काळे वाण येण्यास सुरुवात झाली आहे. याचा बाजारपेठेत मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
त्यात चालू वर्षी मागील वर्षी पेक्षा काढणीसाठी पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत एकरी मजूर दर वाढले आहेत. त्यात मळणी मशीनचे क्विंटल दर वेगळे त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे. 'भिक नको पण कुत्र आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

बाजारभावापेक्षा काढणीचा खर्च जास्त
एकाच वेळी काढणीला आलेले सोयाबीन, मजूर टंचाई, पावसाची टांगती तलवार, यामुळे एकरी चार ते ओल्या जमिनीत सोयाबीन काढणीसाठी साडेचार हजार रुपये इतका दर वाढला आहे. त्याच पटीत सोयाबीनचे बाजार भाव असल्याने शेती कशी कसायची? हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. अल्प भूधारक शेतकरी वर्ग साठवणूक करत नाही. याचा फायदा मात्र काही व्यापारी वर्ग उचलत असतो. परिणामी शेतकरी यांच्यात भरडला गेल्यावर कुटुंबाचे व पुढील हंगामाचे शेती नियोजन कोलमडून जाते.

ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश पुरेसा मिळत नसल्याने, तयार केलेल्या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्याने, परिणामी ट्रान्सपोर्ट वाहतूक वेळेत खाली होत नाही. बाजार भाव कमी- जास्त होत आहे. मात्र पूर्ण वाळलेली, दर्जेदार सोयाबीन पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव आजमितीस आहे.
                                                                  -महेंद्र ट्रेडिंग कंपनी, जळगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT