अहमदनगर

जामखेड : नुकसान 22 कोटी, भरपाई दमडीही नाही !

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृतसेवा : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे 23 हजार 656 शेतकर्‍यांची पिके बाधित झाली असल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामे केल्यानंतर तालुका प्रशासनाने 13 हजार 995 हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 22 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे 3 नोव्हेंबर रोजी केली होती. शासनाकडे मागणी करूनही खात्यात अजून दमडीही आली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जामखेड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अनेक भागांत सतत पाऊस पडला होता.

तसेच, अनेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली होती व तातडीने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश महसूल व कृषी विभागास दिले होते. त्यानुसार दिवाळी अखेरपर्यंत पंचनामे करण्यात आले.
त्यानंतर बाधित क्षेत्राचे अवलोकन करून त्यानुसार 22 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. आजपर्यंत खात्यावर दमडीही आली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये सरकारवर नाराजीचा सूर उमटत आहे.

नुकसान झालेल्या जिरायत पिकासाठी 16.31 कोटीची मागणी करण्यात आली होती. यामध्ये जिरायत व बागायत पिकांचे नुकसान सततच्या पावसामुळे झाले आहे. जिरायत पिकांचे 19 हजार 527 शेतकर्‍याच्या 11 हजार 990 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यात प्रामुख्याने सोयबीन, उडीद, मूग पिकांचा समावेश आहे. बागायत आणि हंगामी बागायत पिकांमध्ये एकूण 4 हजार 129 शेतकर्‍यांचेे 2005 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.

यामध्ये प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमॅटो या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे वरील सर्व पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडे जिरायत पिकांसाठी 16.31 कोटी, बागायत पिकांसाठी 5.41 कोटी, अशा एकूण 22 कोटी रुपयाच्या शासकीय अनुदानाची मागणी तालुका प्रशासनाने केलेली आहे.

दोन्ही आमदारांनी पाठपुरावा करावा

आ.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यात श्रेयवादाचे राजकारण सुरु आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे होऊन एक महिना उलटला तरी दमडी देखील शेतकर्‍यांच्या खात्यावर आली नाही. याबाबत दोन्ही आमदार यांनी पाठपुरावा करणे गरजेचा आहे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

मदत येताच जमा करणार : तहसीलदार चंद्रे

नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे खाते पुस्तक व आधार कार्ड तलाठी कार्यालयात जमा केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती जमा केलेली आहे. नुकसानीबाबत शासन स्तरावरून मदत येताच शेतकर्‍यांच्या खात्यावर ती तातडीने वर्ग केली जाईल, असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT