नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 3) अनेक दिग्गजांसह 186 अर्ज दाखल झाले. त्यासाठी तालुका उपनिबंधक कार्यालयात अक्षरशः झुंबड उडाली होती. एकूण 228 अर्ज दाख़ल झाल्याने माघारीच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. नगर बाजार समितीच्या 18 जागांसाठी दि. 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेतकर्यांना प्रथमच बाजार समितीचा संचालक होण्याचा बहुमान मिळणार असल्याने अनेक शेतकर्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यातच सर्वाधिक अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले.
नगर बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले यांचे पंधरा वर्षापासून वर्चस्व दिसून येते. यावेळी देखील माजी मंत्री कर्डिले विरोधात महा विकास आघाडी अशीच लढत पाहावयास मिळणार आहे. कर्डिले यांच्या मदतीला खासदार विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सुमारे महिनाभर चालणार्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप पाहावयास मिळणार आहेत. एकंदरीत मातब्बर उमेदवारांमुळे नगर बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
या दिग्गजांनी सोमवारी भरले अर्ज
सुप्रिया अमोल कोतकर, संदीप कर्डिले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, अंकुश शेळके, माजी सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे रेश्माताई चोभे, दीपक कार्ले, सुधीर भापकर, अशोक झरेकर, विलास शिंदे, रभाजी सूळ, दत्ता तापकीर, मंगलदास घोरपडे, बाबा खर्से, भाऊसाहेब बोठे, सनी लांडगे, गुलाब शिंदे, राजू आंधळे, सत्यभामा कुलट, उद्धव दुसुंगे, रामदास सोनवणे, विजय शेवाळे, गोरख काळे, संजय जपकर, दिलीप भालसिंग, नंदकिशोर शिकारे, संजय गिरवले, विशाल निमसे, बहिरू कोतकर आदी.
प्रचारात कर्डिले यांची आघाडी
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच प्रचाराचा नारळ फोडून आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कर्डिले-कोतकर यांच्या सत्तेला शह देण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न चालविला आहे. भाजप नेते कर्डिले यांनी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसह मतदारांना भेटी-गाठीसाठी वाळुंज येथे बोलावले आहे. मतदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच त्या परिसरातील अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीनेही ठिकठिकाणी मेळावे घेऊन तोडीस तोड उमेदवार देण्याची चाचपणी केली आहे.
मतदारसंघनिहाय दाखल अर्ज
सोसायटी ः 134
ग्रामपंचायत ः 66
व्यापारी-आडते ः 12
हमाल-मापाडी ः 16
एकूण ः 228