अहमदनगर

पाथर्डी तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीतील सत्तेचे ढाकणे-राजळेंचे दावे-प्रतिदावे

अमृता चौगुले

अमोल कांकरिया

पाथर्डी तालुका : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा सरपंच निवडून आल्याचा दावा आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्क कार्यालयातील प्रसिद्धी पत्रकातद्वारे करण्यात आला, तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केला. या दावे- प्रति दाव्यांमुळे आता पुन्हा एकदा ढाकणे- राजळे येत्या काळात पाथर्डीकरांना सत्ता संघर्ष पाहायला मिळणार, यात शंका नाही.

तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळाले असून, सर्वाधिक सरपंच व सदस्य भाजपचे विजयी झाले. यापुढील काळात निवडणूका झालेल्या सर्वच गावात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा विकास निधी मंजुर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती भाजपतर्फे देण्यात आली.

राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने तिसगाव, भालगाव, वैजू बाभुळगाव, वडगाव, कोल्हार, मोहरी या सहा ठिकाणी सत्ता मिळवली आहे. तर, कोळसांगी ही ग्रामपंचायत अपक्ष निवडून आली. कोरडगावमध्ये वंचित बहुजन आघाडी, जिरेवाडीत प्रहार जनशक्ती पक्ष निवडून आल्याने भाजपला दोन जागा मिळाल्याचे अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष वैभव दहिफळे, पांडूरंग शिरसाठ, अजिनाथ खेडकर, वसंत खेडकर, शिवाजी बडे, एम. पी. आव्हाड आदी उपस्थित होते. ज्या अपेक्षांनी मतदारांनी ग्रामपंचायतमध्ये सरपंच व सदस्यांना सत्ता दिली, त्यापद्धतीने चांगला कारभार करून गावचा विकास साधतील, असा विश्वास अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.

भाजपला सपशेल निवडणुकीत अपयश : अ‍ॅड. ढाकणे
अ‍ॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्र आले आणि तालुक्यातील मोठ्या असणार्‍या तिसगाव आणि भालगाव ग्रामपंचायतमध्ये लोकांनी स्वाभिमान जागा ठेवून सत्तांतर केले. भालगाव सारख्या मोठ्या गावामध्ये निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले, त्याला मतदार बळी पडले नाही, स्वाभिमानाने मतदान करून सत्ता राष्ट्रवादीकडे दिली. 'पैसा आहे म्हणून आम्ही काही करू शकतो,' अशी डोक्यात असलेली हवा मतदारांनी बाहेर काढली. राष्ट्रवादी, तसेच आघाडीला या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 11पैकी फक्त दोन ठिकाणी भाजपची ग्रामपंचायत निवडून आली. त्यामुळे भाजपला सपशेल या निवडणुकीत अपयश आल्याचं अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.

तालुक्यात विजयी घोडदौड सुरूच राहिल : भाजप
आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सोनोशी, मोहरी, तिसगाव, निवडुंगे, भालगाव व कोळसांगवी या ठिकाणी भाजपचे सरपंच व सदस्य विजयी झाले आहेत. तर, वडगाव, वैजुभाबुळगाव, कोरडगाव, जिरेवाडी, कोल्हार येथेही पक्षाला संमिश्र यश मिळाले असल्याचे सांगिण्यात आले. आमदार राजळे यांनी केलेल्या विकासकामांची ही पावती असून, जनतेने आमदार राजळे व भाजवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समिती निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड सुरूच राहिल, असेही पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT