अहमदनगर शहर मतदारसंघात 'खर्च संवेदनशील'  File Photo
अहमदनगर

Ahmednagar | अहमदनगर शहर मतदारसंघात 'खर्च संवेदनशील'

पुढारी वृत्तसेवा

नगर : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असून, हा मतदारसंघ खर्च संवेदनशील म्हणून जाहीर झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भरारी, स्थिर निगराणी, व्हिडीओ निगराणी पथकांची संख्या अधिक असणार आहे.

या पथकांच्या माध्यमातून प्रचार सभा व इतर ठिकाणी होणाऱ्या खर्चावर नजर ठेवली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. अहमदनगर शहर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रोकड पकडली गेली होती. मद्य व इतर वाटपासाठी येथे मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा अहवाल आयोगाकडे दाखल झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा आठ भरारी पथके, चार स्थिर निगराणी, सहा व्हिडीओ निगराणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मतदार नोंदणीची अजूनही संधी

ज्याचे मतदारयादीत नाव नाही, अशा नागरिकांसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ९२५६ मतदार वाढल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले.

अर्ज भरताच मीटर सुरू

२२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्ज दाखल करताच उमेदवाराचे खर्चाचे मीटर सुरू होणार आहे. त्या अगोदर होणाऱ्या सभा आणि प्रचाराचा खर्च धरला जाणार नाही.

मात्र, आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, दोन दिवसांत समतानगर, मिस्किन मळा आदी ठिकाणी पोस्टर, बॅनर्स हटविले नाहीत, अशा तीन तक्रारी सी- व्हिजिल अॅपवर दाखल झाल्या. त्या तक्रारींचे निरसन केले असल्याचे पाटील यांनी सांगितले

प्रचार खर्च मर्यादित करा

मतदारसंघात ८ भरारी पथक, ४ स्थिर निगराणी तर ६ व्हिडीओ निगराणी पथक कार्यान्वित केले आहेत. या पथकांद्वारे निगराणी केली जाणार आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन करा, प्रचार खर्च मयदित करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT