शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : सहकाराच्या माध्यमातून शेतकरी उन्नत होतो. शेती व सहकाराची योग्य सांगड घालून नगर जिल्ह्याने प्रगती साध्य केली. यामध्ये अ. नगर जिल्हा सहकारी बँकेचा वाटा मोठा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
अ.नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शिर्डी शाखेचा उद्घाटन समारंभ मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., खा. डॉ. सुजय विखे पा., खा. सदाशिव लोखंडे, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे, अंबादास पिसाळ यांच्यासह संचालक उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले, शेतकर्यांसह प्रत्येक तालुका व जिल्हा समृद्ध करण्यामध्ये जिल्हा बँकेने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून पशु पालकांना अर्थसहाय्य करण्याची भूमिका किंवा निर्णय व्हावेत. पशु पालकांच्या उत्पन्नात अधिक भर पडण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे मंत्री विखे म्हणाले.
बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्तविक रावसाहेब वर्पे यांनी केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
इमारत बँकेच्या प्रगतीमध्ये भर घालणार!
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, शेतकर्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची ओळख कायम राहिली आहे. शिर्डी येथे साकार झालेली इमारत बँकेच्या प्रगतीमध्ये भर घालणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.