अहमदनगर

राहुरी : दुचाकी चोरीनंतर तडजोडी जोमात…पोलिस कोमात!

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे शिखर गाठणार्‍या राहुरी परिसरामध्ये दुचाकी चोरट्यांचा उपद्रव पुन्हा सुरू झाला आहे. दुचाकी चोरून नेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी तडजोडीचा पर्याय देत पैसे उकळले जात आहे. पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची किमया सुरू आहे. दुचाकी मालकांमध्ये चोरट्यांची वाढलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने हाताची घडी सोडून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

राहुरी परिसराला गुन्हेगारीने वेढले आहे. एकेकाळी शांत व समृद्धतेचा शिक्कामोर्तब झालेल्या राहुरीला गुन्हेगारीच्या ग्रहणाने त्रस्त केले आहे. वाळू तस्करी, गावठी कट्ट्यांचा वापर, चोरी, घरफोडी, दुकान फोडी, हाणामार्‍या, महिलांची छेडछाड, अत्याचार आदी घटनांनी राहुरी परिसरामध्ये दहशत वाढली आहे. कायदा सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांचा वचक राहिला नसल्याने अवैध धंदे करणार्‍यांनी वर्चस्व निर्माण केले आहे.

दरम्यान, गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकाराने त्रस्त सर्वसामान्यांना आता दुचाकी चोरट्यांनी शॉक देण्याचा सपाटा लावला आहे. राहुरी शहरातील व्यापारी पेठ, रुग्णालयासमोरून दुचाकी चोरून नेण्याचे अनेक प्रकार घडत आहे. रात्री घरासमोर लावलेली दुचाकी शोधणार्‍यांची संख्याही वाढली आहे. दुचाकी चोरीस गेल्यानंतर एजंटची साखळी तयार करण्यात आली आहे. संबंधितांकडून दुचाकी मालकाशी संपर्क साधला जातो. दुचाकीच्या किमतीनुसार तडजोडीची किंमत ठरवली जाते.

ही रक्कम एजंटमार्फत पोहोच केल्यानंतर दुचाकी टाकून दिल्याचे ठिकाण सांगितले जाते. हा अजब प्रकार पेालिस किंवा इतर कोणालाही सांगितल्यास दुचाकीचे सर्व साहित्य विक्री करण्याची दमबाजी केली जाते. परिणामी दुचाकी चोरीबाबत तडजोडीचा धंदा दुचाकी चोरट्यांसाठी लाभदायी ठरत असल्याचे संतप्त चित्र दिसत आहे. दुचाकी सोडवून आणण्यासाठी दुचाकी मालकांना हजारो रुपयांचा गंडा दिवसाढवळ्या घातला जात असताना पेालिस प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे.

राहुरी परिसरात दुचाकी चोरट्यांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार अनेक पोलिस कर्मचार्‍यांना चोरट्यांची माहिती आहे. तक्रार दाखल करणार्‍यांनाही दोन ते तीन दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो. 'दुचाकी चोरटे तुमच्याशी संपर्क साधतील', असे सांगत दुचाकी चोरीने त्रस्त नागरिकांनाच तडजोडीस प्रवृत्त करण्याचे काम काही पोलिस कर्मचारी करीत असल्याचे बोलले जात आहे. राहुरी परिसराला अनेक वर्षांपासून दुचाकी चोरट्यांनी त्रस्त केले आहे.

अनेक दुचाकी चोरट्यांच्या टोळ्याही पोलिस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या, परंतु वरदहस्तांमुळे दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यातून बाहेर पडत सर्वसामान्यांना आपल्या फासामध्ये अडकवत आहेत. राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना अजूनही दुचाकी चोरट्यांपैकी एकासही पकडण्यात यश आले नाही. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने दुचाकी चोरटे आपली किमया राजरोसपणे दाखविण्यात निर्ढावले आहेत,पण पोलिस अधीक्षक ओला यांचे राहुरीकडे लक्ष आहेच!

तडजोडीनंतर दुचाकी मुळा धरण पायथ्याशी..! दुचाकी चोरट्यांना अपेक्षित रक्कम मिळताच ते दुचाकी असलेल्या जागेचा पत्ता सांगतात. मुळा धरण परिसरातील काटवन किंवा नगर- मनमाड रस्त्यालगतच्या काटवनात गाडी असल्याचे सांगितले जाते. मोडतोड अवस्थेत दुचाकी ताब्यात घेत दुचाकी मालक सुटकेचा निःश्वास टाकतात.

गुन्हेगारी नोंदविण्यात अव्वल.. कारवाईत शून्य.!
राहुरी तालुका गुन्हेगारीच्या आकड्यांबाबत जिल्ह्यात अग्रक्रमांकाच्या दिशेने धावत आहे, परंतु कारवाईबाबत राहुरी पोलिसांची कामगिरी चांगली खालावली आहे. याबाबत राहुरी पोलिस निरीक्षक दराडे यांनी प्रताप दाखवून गुन्हेगारांवर दरारा निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT