अहमदनगर

धानोरे : विद्यार्थ्यांचे टॅलेंट पाहून आ. सत्यजीत तांबे अवाक्

अमृता चौगुले

धानोरे; पुढारी वृत्तसेवा : वेळ दुपारी चारची, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघे वस्ती (धानोरे) येथील शाळेचे वर्ग सुरू असताना अचानक या शाळेत नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांचे आगमन होते. कुठलाही नियोजित कार्यक्रम नसताना आमदार तांबे शाळेत आल्याने शिक्षक व विद्यार्थी आश्चर्यचकित होतात. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी व आमदार यांच्यात झालेल्या संवाद व प्रश्नोत्तराने सर्वजण भारावून गेले.

आ. तांबे यांचे आगमन होताच प्राथमिक शाळेत शिकणार्‍या चिमुकल्यांनी त्यांचे केलेले स्वागत लक्षणीय होते. त्यानंतर आमदार तांबेंनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इंग्रजी शब्द फळ्यावर लिहून त्या शब्दांचा उच्चार व त्यांचे अर्थ विचारले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर पाहिले.

इयत्ता पहिलीच्या वर्गात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी 'छोटेसे बहिण भाऊ उद्याला मोठाले होऊ 'या गीताचे आमदार तांबेंनी भरभरून टाळ्या वाजवून कौतुक केले. सर्वात शेवटी गौरी राजेंद्र दिघे या विद्यार्थिनीने त्यांना वाटेतच आडवत त्यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावर आमदार म्हणाले की कुठलीही तयारी नसताना तू माझी मुलाखत कशी घेणार? तुझी तयारी असेल तर मी मुलाखत देण्यास तयार आहे, असे म्हणत शाळेतील पढवीतच त्यांनी या विद्यार्थिनीला मुलाखत दिली. नंतर त्यांनी या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली.

यावेळी या विद्यार्थिनीने दिलेल्या उत्तरांनी आमदार तांबे भारावून गेले. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या शाळेसाठी कुठलीही अडचण असेल तर ती अडचण दूर केली जाईल, असे आश्वासन विद्यार्थी व शिक्षकांना दिले. यावेळी युवा नेते किरण कडू, पंकज कडू, जयराम दिघे, राहुल दिघे, भगवान लांडे, सौरभ दिघे यांचेसह शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला कलंगुडे, राज्य आदर्श शिक्षक राजेंद्र बोकंद, विद्याताई बोकंद, सुनीता ताजने, सीताबाई डोमे, मनीषा शिंदे हे शिक्षक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT