Cloudburst like rain in Karjat too
कर्जतमध्येही ढगफुटीसदृश पाऊस पुढारी
अहमदनगर

नगर : कर्जतमध्येही ढगफुटीसदृश पाऊस

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. गेल्या अनेक वर्षांपासून झाला नाही असा पाऊस शहराच्या परिसरात पडला. शहरातील सर्वांत मोठा आणि रुंद असणारा मेन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पाऊस सुरूच असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कर्जत शहर व परिसरात सोमवारी दुपारी सुमारे अडीच तास पाऊस धुवाधार कोसळला. अवघ्या काही मिनिटांतच सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यानंतरही जोरदार पाऊस कोसळत होता. शहरातील बसस्थानक परिसरातील मेन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. प्रचंड वेगाने या रस्त्यावरून पाणी वाहत होते.

मागील काही वर्षांपासून एवढा पाऊस या परिसरामध्ये झालेला नव्हता. शहरातील सर्वांत मोठा असणार्‍या रस्त्यावरूनही जणू नदीच वाहत होती. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. या रस्त्यावर पाणी मावत नव्हते.

आठवडे बाजार असल्यामुळे हाल

सोमवार हा कर्जतचा आठवडे बाजारचा दिवस. चार वाजता पाऊस सुरू झाल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच धावपळ उडाली. शेतकरी, महिला, विक्रेते यांचे त्यामुळे हाल झाले. विक्रेत्यांच्या भाज्या पाण्यामध्ये गेल्या. सर्वांना मिळेल त्या ठिकाणी आश्रयाला थांबावे लागले. या पावसाने बाजारतळ व सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाणारे विद्यार्थीही या पावसात अडकून पडले.

पिकांच्या नुकसानीची भीती

खरीप पिके चांगली उगवण असताना जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने ती पाण्याखाली गेली आहेत. या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT