संगमनेर :पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शिक्षण हक्क कायदा केलेला होता. मात्र सध्याच्या राज्यात असणारे शिंदे आणि फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांचा हक्क काढून घेण्याचे धोरण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील १७ हजारांपेक्षा जास्त शाळा बंद होणार असून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी ते माध्यमांशी बोलत हाेते.
शिक्षण हक्क कायद्यात प्रत्येक सहा वर्षाच्या बालकाला शिक्षण मिळणार असा निर्णय यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला होता. मुलाचे शिक्षण झाले पाहिजे याची जबाबदारी पालक आणि शासनाची आहे. एखाद्या वस्तीवर एक बालक असेल आणि त्याच्या वस्तीपासून शाळा दूर असेल तर त्याला त्याठिकाणी शाळेची एकखोली बांधून तिथेदोनशिक्षक देणे, पोषण आहार देणे, ही सगळी जबाबदारी शासनाची आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही. घटनेमध्ये सुद्धा याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता जरकोणी वाड्या -वस्त्यांवरील शाळा बंद करून मुलांना मजुरीला लावणे हे धोरण या सरकारचे असेल तर ते श्रीमंतीला धार्जिन असणारे धोरण आहे, असा आराेपही त्यांनी केला.
परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, फळबागा,बाजरी हे पिके भुईसपाट झाली आहे. त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. मात्र मात्र तसे होताना दिसत नाही. हे मोठे दुर्दैव आहे. अजूनही शेतकऱ्यांचे पंचनामेही झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. पोषण आहारात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेच्या खाली गेला आहे. देशातील अनेक लोक उपाशी राहू लागले आहे. ही फार मोठी शोकांतिका असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या कानाकोपऱ्यात भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यात फिरून ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सहा नोव्हेंबरला येत आहे. महाराष्ट्रात कधीही कुठेही झाली नाही अशी रेकॉर्ड ब्रेक सभा महाराष्ट्रात नांदेड आणि शेगाव येथे घ्यावी, अशी विनंती राहुल गांधी यांना करणार असल्याचे थोरात यांनी या वेळी सांगितले.