अहमदनगर

Nagar : मुरूम चोरीवरून स्थायी समितीत रणकंदन

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव माळवी तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुरूम उत्खनन सुरू आहे. हा मुरूम चोरणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करा. त्या परिसराच्या देखरेखीची जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, विनीत पाऊलबुधे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. अधिकार्‍यांनी सुरुवातीला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. सदस्यांचा पारा चढल्यानंतर नरमाईची भूमिका घेत पाहणी करून कारवाईसाठी अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर महापालिका स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य संपत बारस्कर, विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, राहुल कांबळे, रूपाली वारे, ज्योती गाडे, सुनीता कोतकर, पल्लवी जाधव, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त कुर्‍हे, नगरसचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते. पिंपळगाव माळवी तलावातील मुरूम चोरी प्रकरणी कवडे यांनी जाब विचारला असता अधिकार्‍यांनी प्रश्नाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू केली. अखेर उपायुक्त कुर्‍हे यांनी ती जबाबदारी नगररचना विभागाची असल्याचे सांगितले. त्यावर चारठाणकर म्हणाले, की त्याकडे प्रभाग अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विनित पाऊलबुधे म्हणाले, की आपणे सर्व जण एकाच ठिकाणी आहात. आता उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर जबाबदारी निश्चित करा. त्यानंतर कुर्‍हे म्हणाले, की तलावाची पाहणी करून रीतसर अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.

सीना नदीत रसायन कोणाचे?
सुरुवातीलाच कवडे यांनी सीना नदीत रसायन कोणत्या कंपनीने सोडले, असा प्रश्न अधिकार्‍यांना विचारला. त्यावर प्रदूषण महामंडळाला अहवाल सादर केला आहे. मात्र, रसायन कोणत्या कंपनीने सोडले हे अद्याप समजले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
महापालिकेची हद्द सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी अधिकार्‍यांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवतीच्या सुशोभीकरणाची निविदा काढण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भूमिपूजन करण्याचा मानस आहे. त्यापद्धतीने तयारी करावी, अशा सूचना कवडे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

रस्ते पॅचिंगची कामे अद्याप अपुरी आहेत. बांधकाम विभागाने ती काम तत्काळ पूर्ण करावीत. तसेच, ड्रेनेजच्या कामांनाही गती द्यावी, अशा सूचना संपत बारस्कर यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महापालिकेने नवीन डीपीआरला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात पदाधिकार्‍यांना कधी माहिती मिळेल, असे बारस्कर यांनी विचारले. त्यावर नगररचनाकार राम चारठाणकर म्हणाले, की डीपीआरसाठी स्वतंत्र उपसंचालकांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारीही असतील.
अधिकार्‍यांच्या विरोधात

ठराव करणार : बारस्कर
स्मार्ट एलईडी योजनेला प्रारंभ होऊन दोन वर्षे झाली तरी अद्याप, ठेकेदाराचे एकही बिल निघाले नाही. परिणामी पथदिव्यांचा मेटेनन्स होत नाही. विद्युत विभागाकडून 'थर्ड पार्टी रिपोर्ट' बाकी असल्याचे समजते. त्यासाठी विद्युत विभागाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पाठपुरावा न केल्यास अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा ठराव करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिला.

छत्रपतींच्या पुतळ्याला अंतिम मान्यता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा बसविण्यासाठी येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकार्‍याकडून अंतिम मान्यता मिळणार आहे, असे सभापती गणेश कवडे म्हणाले. दरम्यान, राहुल कांबळे म्हणाले, की मार्केट यार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. त्यासाठी सुशोभीकरणाची निविदा काढण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT